खांद्यावर बंदूक नाही नांगर घेऊन सुटतील प्रश्न- पंतप्रधान

0
15

वृत्तसंस्था
रायपूर दि. ९ –बंदूक खांद्यावर घेऊन प्रश्न सुटत नाहीत, प्रश्न सोडवायचे असतील तर खांद्यावर नांगर पाहिजे. असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नक्षलवाद्यांचा गड असलेल्या दंतेवाडा येथे नक्षलींना हिंसेचा मार्ग सोडण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘जेथून नक्षलवाद सुरु झाला त्या नक्षलबाडीनेही आता रंक्तरंजित मार्ग सोडून दिला आहे.’ विकासाशिवाय प्रगती नाही आणि विकास बंदूकीच्या नळीने होत नसल्याचे पंतप्रधान म्हणाले.
जेथून नक्षलवादाचा उमग झाला त्यांनी देखील हा मार्ग सोडला आहे, त्यामुळे देशवासियांनी निराश होण्याची गरज नाही. हा रक्तरंजित खेळ देखील बंद होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘खांद्यावर बंदूक ठेवून नाही, तर नांगराचा फाळ घेतल्याने प्रश्न सुटणार आहेत. माझे आवाहन आहे, की नक्षलवाद्यांनी हा हिंसेचा मार्ग सोडला पाहिजे.’
त्याआधी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आदिवासींची पारंपरिक टोपी त्यांच्या डोक्यावर ठेवण्यात आली. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच छत्तीसगडमध्ये पोहोचले आहेत. शनिवारी सकाळी ते नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा गड समजल्या जाणाऱ्या बस्तर येथे पोहोचले.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
– बस्तरने जगाला जगण्याचा अर्थ सांगितला आहे.
– काम करण्यासाठी गावातील तरुण शहरात जाऊन झोपडीत नाही राहिला पाहिजे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे.
– सरकार पहिले पण होते. काम देखील होत होते, पण काम एवढ्या धिम्या गतीने होत होते, की लोक निराशेच्या गर्तेत जात होते.
– शेतकरी मला भेटतात आणि सांगतात मुलांना रोजगार मिळेल असे काही करा.
– गरीबाच्या झोपडीपर्यंत विकासाची फळे पोहोचली पाहिजे.
– देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
– जगदलपूर रेल्वे लाइनमुळे बस्तर देशाशी जोडले जाईल – पंतप्रधान
– रेल्वे फक्त प्रवासाचे माध्यम नाही तर, जीवनाला गती देते
– खांद्यावर नांगर असेल तरच प्रश्न मिटतील, खांद्यावर बंदूक घेऊन प्रश्न सुटू शकत नाही.
– जेथून नक्षलवाद सुरु झाला होता. रक्ताचे पाट वाहात होते, आता तिथे हा रक्तरंजित खेळ बंद झाला आहे.
– हिंसेचे कोणतेही भविष्य नाही,
– मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी मुलांना कॉम्प्यूटरचे शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच नवा देश घडणार आहे.
– नक्षलबाडीने आता हिंसा सोडून दिली आहे.
– नक्षलवादाच्या समस्येतून छत्तीसगडची सुटका झाली तर, राज्य देशात अव्वलस्थानी राहील.