राष्ट्रवादीचे सुधाकर सोनवणे नवी मुंबईच्या महापौरपदी विराजमान, उपमहापौरपद काँग्रेसकडे!

0
20

मुंबई दि. ९– नवी मुंबईच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर सोनवणे विराजमान झाले आहेत. आज सकाळी झालेल्या निवडणुकीत सोनवणे यांनी 67 मते मिळवत शिवसेनेचे नगरसेवक संजू वाडे यांचा 23 मतांनी पराभव केला. वाडे यांना 44 मते मिळाली. उपमहापौरपदी काँग्रेसचे अविनाश लाड विजयी झाले आहेत.
नवी मुंबईत शिवसेना-भाजपची ताकद वाढल्याने भविष्यात काम करताना अडचण येऊ नये म्हणून गणेश नाईक यांनी चलाख खेळी करीत काँग्रेसला महापौरपद देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडून अविनाश लाड यांनी तर युतीकडून उज्वला झंजाड यांनी अर्ज भरला होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे लाड यांनी बाजी मारली.
मागील महिन्यात झालेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत 111 सदस्यांच्या पालिका सभागृहात राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक निवडून गेले आहेत. काँग्रेसला 10 जागा मिळाल्या होत्या. उर्वरित 5-6 अपक्षांनीही गणेश नाईक यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीकडे 67 इतकं संख्याबळ झाले आहे.
महापौरपदी विराजमान झालेले सुधाकर सोनवणे व त्यांच्या पत्नी या राखीव (SC) वॉर्डातून निवडून आले आहेत. सोनवणे दांपत्य या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरले होते. या दोघांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. नवी मुंबईचे महापौरपद एससी कॅटेगरीसाठी राखीव असल्याने सोनवणे यांना गणेश नाईक यांनी संधी दिली आहे. शिवसेनेचे ठाण्यातील मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत शिवसेना चमत्कार करेल व महापौरपद मिळवेल असा दावा केला होता. मात्र तो सोनवणे व नाईक यांनी फोल ठरवला आहे.