सरसंघचालकांच्या भेटीला अमित शहा नागपुरात

0
7

नागपूर ,दि. १६- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज (शनिवार, ता. १६) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीसाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह येऊन गेले, तर रविवारी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर येत आहेत. एकापाठोपाठ भाजपचे बडे नेते येत असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. संघातर्फे मात्र सर्व नेते तृतीय संघशिक्षा वर्गासाठी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी तब्बल दोन तास सरसंघचालकांशी चर्चा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी गेले. खासदार अजय संचेती यांच्या घरी भोजन केले. तसेच संघाचे माजी बौद्धिकप्रमुख मा. गो. वैद्य यांची भेट घेतली. या भेटीत राजनाथसिंह यांनी वर्षपूर्तीकडे वाटचाल करीत असलेल्या भाजपच्या मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड सरसंघचालक मोहन भागवत यांना सादर केल्याचे समजते.
भूमिअधिग्रहण विधेयक आणि जीएसटी विधेयकाच्या विरोधात कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपला एक पाऊल मागे घ्यावे लागले. बिहारमध्ये मोदी यांच्याविरोधात सर्व समाजवादी गट एकत्रित आले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती बिहारमध्ये होऊ नये, याची दक्षता पक्षातर्फे घेतली जात आहे. याच निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अमित शहा सरसंघचालकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असल्याचे भाजपच्या राजकीय वर्तुळातून समजते.

अमित शहा शनिवारी सकाळी सव्वासात वाजता दिल्लीवरून नागपूर विमानतळावर आले. सकाळी साडेआठ ते साडेदहापर्यंत रविभवन येथे ते थांबल्यानंतर सकाळी 11 वाजता ते संघ मुख्यालयात जातील. 11 ते 1 पर्यंत सरसंघचालकांशी चर्चा करतील. दुपारी 1.30 वाजता अमित शहा रविभवनातून विमानतळाकडे रवाना होतील. येथून ते विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.