विदर्भात वीज पडून मजूर ठार

0
13

चंद्रपूर- जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यातील राजुरा तालुक्‍यात वीज पडून एका मजुराचा मृत्यू झाला, तर भंडारा जिल्ह्यातील निलज शिवारात सात शेळ्या ठार झाल्या. तसेच महिला व मुलासह अन्य शेळ्या किरकोळ जखमी झाल्या. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्‍यात 43 शेळ्या मृत्युमुखी पडल्या.

भंडारा जिल्ह्यातील निलज शिवारात चरण्यास गेलेला शेळ्यांचा कळप आणि गुराखी महिला पावसापासून बचाव करण्यासाठी देविदास ढोक यांच्या शेतातील झोपडीत गोळा झाले. दरम्यान, झोपडीजवळ असलेल्या कडुनिंबाच्या झाडावर वीज कोसळून कळपातील सात शेळ्या ठार झाल्या, तर अन्य सात शेळ्या जखमी झाल्या. गुराखी महिला कांताबाई अशोक अहिरकर (वय 45) आणि सोबत असलेला आशिष एकनाथ मुदगल हे दोघे जखमी झाले.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्‍यातील विहीरगाव येथे वीज पडून अरविंद कपिलदास बारासिंगे (वय 31, रा. सोनापूर, ता. सावली) या मजुराचा मृत्यू झाला. चामोर्शी (जि. गडचिरोली)पासून दहा किलोमीटरवर असलेल्या मारोडा येथील उमाजी मोहुर्ले यांच्या शेतातील झाडावर वीज कोसळली. झाडाखाली उभ्या असलेल्या 43 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. यात कोमना राजन्ना गिलवार (रा. भंगाराम तळोधी) यांचे तीन लाखांचे नुकसान झाले.