गडचिरोली: सूरजागड लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असताना आता यामुळे शेतकरीही अडचणीत सापडला आहे. धुळीमुळे रस्त्यालगतच्या शेकडो एकर शेतीमधील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु प्रशासनाचे शेतकऱ्यांपेक्षा लोहखनिज वाहतुकीकडेच अधिक लक्ष असल्याने पीडित शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी आष्टी ते आलापल्ली मार्ग पूर्णपणे खराब झालेला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने येथे दररोज लहान-मोठे अपघात होतच असतात. या मार्गावरील बोरी, राजपूर प्याच, शिवनीपाठ, या गावातील अनेकांची शेती रस्त्याच्या दुतर्फा आहे. यात प्रामुख्याने कापसाचे पीक घेतल्या जाते. मात्र, दररोज या मार्गावरून होणाऱ्या हजारो अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे शेतपिकांवर प्रचंड धुळ पसरली आहे. सोबतच वाहनांमधून उडणारी धुळ देखील उभ्या पिकांवर साचत असल्याने पिके उद्ध्वस्त झाली आहेत. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या धुळीमुळे हिरावून जातो की काय, अशी विदारक परिस्थिती उद्भवली आहे. उत्खनन करणाऱ्या कंपनीकडून धुळ उडू नये यासाठी सदर मार्गावर पाण्याचा मारा केला जातो आहे. परंतु काहीही उपयोगाचे नाही. यामुळे परिसातील शेतकरी मोठ्या मानसिक तणावत असून प्रशासनाने तत्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे.
वाहतुकीमुळे रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. यामुळे हजारो एकर शेतातील पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत आम्ही जिल्हाधिाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांनी पंचनामा करण्यासंदर्भात आदेश दिले आहे. – अजय कांकडालवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.