vedio-राष्ट्रीय महामार्गालगत वाघाचे बस्तान

0
11

साकोली- साकोलीजवळील मोहघाटा जंगल परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगत एका वाघाने चार दिवसांपासून बस्तान मांडले आहे. हा वाघ दिवसरात्र कोणत्याही क्षणी थेट राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने वाहनचालक, प्रवासी व येथे काम करणार्‍या मजुरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास दिवसाढवळ्या या वाघाने वर्दळीचा राष्ट्रीय महामार्ग ओलांडला. त्याचा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील मोहघाटा जंगल परिसरात वारंवार होणारे अपघात टाळता यावे व वन्यजिवांचे आवागमन सुरक्षित व्हावे यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हा परिसर जंगलव्याप्त आहे. काही महिन्यापूर्वी याच परिसरात एक मादी बिबट अपघातात जखमी झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याच बिबटचा अपघातात मृत्यू झाला. वन्यजीवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महामार्गावर उड्डाणपुलाचे काम जोमात सुरू आहे. या कामावर अनेक मजूर, बांधकाम कंपनीचे कर्मचारीसुद्धा आहेत. परंतु, सध्या या परिसरात गुरुवारपासून एका पट्टेदार वाघाचे दिवसाढवळ्या दर्शन होत असल्यामुळे मजूर व कर्मचार्‍यांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या वाघाने काल सोमवारी दुपारी रस्त्यावर भ्रमण केले होते. त्यानंतर मंगळवारी सुद्धा सकाळी ८ वाजताच्या दरम्यान अत्यंत वर्दळीचा असलेला महामार्ग ओलांडला.
आतापर्यंत या वाघाने कुणावरही हल्ला केला नसला तरी या परिसरातून जाणारे प्रवासी, वाहनचालक, काम करणारे मजूर, कर्मचार्‍यांमध्ये भीती कायम आहे. वाहनचालकांनी वाहने हळू चालवावे तसेच सतर्क राहावे, असे आवाहन वनविकास महामंडळाचे क्षेत्र सहाय्यक जितेंद्र वंजारी यांनी केले आहे.