दोन भरधाव दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू;१२ चाकी ‘हायवा’नाल्यात कोसळली चालक व मदतनिसाचा मृत्यू

0
21

चंद्रपूर,दि.27ः जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलीस ठाणेतंर्गत विठ्ठलवाडा – आष्टी मार्गावर दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज, सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. राकेश जधुनाथ अधिकारी (३०) ठाकुरणगर ता. चामोर्शी, अमोल नैताम मु. बेलगटा चारगाव ता. सावली (२७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, नितेश दामोदर कोवे (२७) मु.चारगाव ता.सावली हा गंभीर जखमी झाला आहे.तिघेही दोन दुचाकीने आष्टी व गोंडपिपरी अशा विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येत होते. दुचाकी अनियंत्रित झाल्याने दोघांनीही एकमेकांना जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, दोघांचाही राकेश अधिकारी व अमोल नैताम या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू, प्रशांत नैताम, गणेश पोदाळी घटनास्थळ गाठून मृतकांचे पार्थिव ताब्यात घेत जखमी युवकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरीत उपचार सुरू आहे. अधिक तपास ठाणेदार राजगुरू करीत आहे.

तर दुसर्या घटनेत आज सोमवारी सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास चिमूर तालुक्यातील शंकरपूर – भिसी मार्गांवर आंबोली गावापासून एक किमी अंतरावर नहरात वाळूने भरलेल्या १२ चाकी हायवाचा भीषण अपघात झाला. पुलावरून गाडी नाल्यात कोसळली. त्यात चालक व मदतनिसाचा जागीच मृत्यू झाला. मृतकांमध्ये वाहन चालक दीपक इंद्रा दीप (३०) व मदतनीस प्रताप शिवकुमार राऊत (२८) यांचा समावेश आहे. दोघेही मृतक नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सुरगाव येथील रहिवासी आहेत.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृतकांच्या शवांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून प्रक्रिया पूर्ण होताच नातेवाईकांकडे मृतकांचे शव सोपविण्यात येतील. चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे त्याचे गाडीवरून नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात स्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. भिसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरपूर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक चांदे पुढील तपास करीत आहेत