देवरी,दि.१७- देवरी तालुका कृषि विभागांतर्गत येणाऱ्या चिचगड मंडळ कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील गणूटोला येथे खरीप हंगामपूर्व शेतकऱ्यांच्या गरजेनूसार शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन काल मंगळवारी (दि.१६) करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गणूटोला येथील सरपंच रसशीला कोरोटी या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवरी पंचायत समितीचे सदस्य रणजीत कासम, इस्तारीचे सरपंच, तालुका कृषी अधिकारी राजपूत मॅडम, मंडल कृषी अधिकारी देवेंद्र बेलेकर, चिचगड पोलिस स्टेशनचे ठाणेदार पाटील, कृषी पर्यवेक्षक फिरोज कापगते, कृषी सहाय्यक अहिराज मॅडम, कृशोन्नतीचे संचालक आदी मान्यवर प्रमुख मार्गदर्शक म्गणून उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी राजपूत यांनी शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत कृषी विभागाच्या विविध योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण, बियाणे निवड, बीज प्रक्रिया, उगवण क्षमता तपासणी, एमआरजीएस अंतर्गत फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड महाडीबीटी,पी एम के एस वाय, सी एम के एस वाय, एम आय डी एच,पीक विमा इत्यादी विषयी सविस्तर माहिती देत या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले.
मंडळ कृषी अधिकारी बेलेकर यांनी पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त कोदो ,कुटकी ,राजगिरा ज्वारी, बाजरी यांचे आपल्या दैनंदिन जीवनातील आहारामध्ये महत्त्व त्याचप्रमाणे या पिकाचे लागवड क्षेत्र वाढवण्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच भात पिकाला पर्यायी पिकाची निवड या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषी पर्यवेक्षक कापगते यांनी भात बियाणे बीज प्रक्रिया करताना तीन ग्रॅम मिठाची बीज प्रक्रिया कशाप्रकारे करतात हे प्रात्यक्षिक स्वरूपात करून दाखवून शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केले .
सूत्रसंचालन गौतम मॅडम यांनी केले. उपस्थितांचे आभार कृषी सेवक अहराज मॅडम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी सहाय्यक हुळे,गावड सहकार्य केले. यावेळी परिसरातील कडिकसा,गणुटोला, इस्तारी येथील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.