कुठलाही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यादृष्टीने नियोजन करा- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
3

जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा

मिशन इंद्रधनुष्य मोहिम तिसरा टप्पा 9 ते 14 ऑक्टोबर दरम्यान

      गोंदिया, दि.8 : लसीकरण हे बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे. सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्यामुळे आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक गावात लसीकरण सत्राचे आयोजन करुन कुठलाही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिले.

       जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नियमीत लसीकरण, विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिमेची जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटिल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

          प्रसूती झाल्यानंतर 24 तासाच्या आत बाळाला हिपॅटायटीस-बी लसीकरण देणे आवश्यक असल्याने खाजगी नर्सिंग रुग्णालयांनी प्रसूती झाल्यावर बालकास हिपॅटायटीस-बी लसीकरण देऊन आरोग्य यंत्रणेस सहकार्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

          जिल्ह्यातील नियमित लसीकरण, विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिमे बाबतचे सादरीकरण जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी केले.

       जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्थेत बीसीजी, हिपॅटायटीस-बी, पोलिओ, पेंटाव्हॅलंट, रोटा व्हायरस, पीसीव्ही, आयपीव्ही, गोवर-रुबेला, जेई, डिपीटी, विटॅमीन-अ डोज इत्यादी विविध लसीकरण मोफत दिले जात आहे. जिल्ह्यात नियमित लसीकरण अंतर्गत गावनिहाय लसीकरण सत्रे आयोजित करुन बालकांना लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात लसिकरणापासुन वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालक व गरोदर मातांसाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिम तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. पहिला टप्पा 7 ते 12 ऑगस्ट, दुसरा टप्पा 11 ते 16 सप्टेंबर यशस्वी झाल्यानंतर आता अखेरचा तिसरा टप्पा 9 ते 14 ऑक्टोबर 2023 दरम्यान राबविले जाणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

           सभेला जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) संजय गणवीर ,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. डी.बी.जयस्वाल, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. सुशांकी कापसे, बालरोग तज्ञ डॉ. सुनिल देशमुख, शिक्षण विभागाचे अनिल चव्हाण, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे डॉ. ईशान तुरकर, प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे तुळशीराम वाघाडे, दृष्टी अशासकीय संस्थेच्या सरिता चव्हाण, तसेच ग्रामीण रुग़्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर सोनारे, डॉ. चंदेलसिंह पारधी, डॉ. प्रशांत तुरकर, डॉ. सलिल पाटिल व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुबोध थोटे, डॉ. विजय राऊत, डॉ. अमित कोडनकर, डॉ. ललित कुकडे, डॉ. विनोद चव्हाण व अशासकिय संस्थेचे प्रमुख उपस्थित होते.