दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

0
88
अमरावती, दि. ३: जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या, तसेच इतर दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेऊन  राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी त्यांना दिलासा दिला. दुर्दैवाने या कुटुंबांवर आपत्ती ओढवली आहे. मात्र, त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, तर एक बहीण म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी राहीन, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी यावेळी दु:खितांचे सांत्वन केले.
भातकुली तालुक्यातील धामोरी येथील नावेद्दिन अयमोद्दीन नावाचा १९ वर्षीय युवक तलावात बुडाल्याची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी या गावाला तात्काळ भेट दिली व त्याच्या कुटुंबियांना दिलासा दिला. यावेळी दुर्घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी रेस्क्यू टीमलाही निर्देश दिले. ही घटना अत्यंत दुर्देवी असून, असे प्रकार घडू नयेत, यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. या तरुणाच्या कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले.
भातकुली तालुक्यातील पांढरी खोलापूर येथील ज्ञानेश्वर सरोदे या शेतकरी बांधवाच्या आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी या गावाला भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला.
जीवनात विविध अडचणी येत असतात. या कुटुंबावर अत्यंत दु:खद प्रसंग आला आहे. मात्र, कुणीही हिंमत हारू नये. एक बहीण म्हणून मी या कुटुंबियांच्या सदैव पाठीशी राहीन, शासनाकडूनही सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशा शब्दांत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सरोदे यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला.
सोनारखेडा येथील प्रशांत मानकर या आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवाच्या कुटुंबाला भेट देऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी त्यांचे सांत्वन केले.
कोरोना संकटकाळात शेतकरी बांधवांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यावर मात करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे. शेतकरी बांधवांनी हिंमत हारू नये. विविध अडचणी येत असल्या तरी त्यावर मात करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी सांगितले. तहसीलदार बळवंत अरखराव यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
या दुर्घटनांत हानी झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत मिळण्यासाठी प्रशासनाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले