
भंडारा,दि.१७:पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकर्यांसाठी मागील वर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा सातशे रुपयांचा बोनस जाहीर होणार असून धानाला एकूण अडीच हजार रुपयांचा भाव मिळणार आहे. याबाबत लवकरच कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खा. प्रफुल पटेल यांनी शनिवारी भंडारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, राज्य शासनाने मागील वर्षीच्या खरीप हंगामासाठी धानाला सातशे रुपयांचा बोनस जाहीर केला होता. त्यापैकी जवळपास ९८ टक्के शेतकर्यांना बोनसची रक्कम मिळाली आहे. त्यातून सुमारे १४00 कोटी रुपयांची बोनसची मोठी रक्कम शेतकर्यांना प्राप्त झाली आहे. त्यातही भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात धान उत्पादक शेतकर्यांची संख्या अधिक असल्याने बोनस राशीचा मोठा हिस्सा या दोन जिल्ह्यातील शेतकर्यांनाच मिळाला असल्याने येथील शेतकर्यांसाठी ही मोठी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावर्षी केंद्र सरकारने धानाला १८६८ रुपये हमीभाव जाहिर केला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापूराने पूर्व विदर्भातील धान शेतीचे मोठे नुकसान केले. नदीकाठावरील शेतशिवारातील धानपिकाला पुराचा फटका बसला असला तरी उर्वरित भागात धानाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकर्यांना मागील वर्षीप्रमाणेच याहीवर्षी सातशे रुपयांचा बोनस जाहीर करण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली आहे. लवकरच कॅबिनेटमध्ये याला मंजुरी मिळेल. त्यामुळे धानाला २५६८ रुपये इतका भाव मिळणार आहे. दरम्यान, बोनसची रक्कम मिळण्यासाठी शेतकर्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असेही खा. पटेल यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आ. नरेंद्र भोंडेकर, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आ. राजेंद्र जैन, धनंजय दलाल उपस्थित होते.