कोरोना चाचण्या वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्या – पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

0
47
????????????????????????????????????

बुलडाणा,दि.18: गत काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या कमी झालेली दिसून आली. ही दिलासादायक बाब असली तरी  कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाल्यामुळे ही संख्या कमी तर आली  नसेल, याबाबत पडताळणी करावी. पुढील काळात दररोज एक हजार चाचण्या झाल्या पाहिजे. प्रयोगशाळाही पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने दररोज एक हजार चाचण्यांचा टप्पा गाठला जाईल, अशा प्रकारे कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्गविषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तडस, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ग्राम स्तरावरील आरोग्य यंत्रणेला पुन्हा सक्रिय करून बाधित रूग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांच्या चाचण्या कराव्यात. चाचण्यांचा वेग वाढविण्यात यावा. उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व मोठ्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड चाचणीची व्यवस्था करण्यात यावी. नागरिकांना दूरवर जावे लागू नये. गावाजवळच कोविड चाचणीची व्यवस्था केल्यास चाचण्या वाढतील. चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिले.  याप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.