उड्डाणपुलासह वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावर खा.पटेलांची अधिकार्यांशी चर्चा

0
193

गोंदिया,दि.18ः-गोंदिया शहरातील जुन्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी तयार करण्यात येत असलेल्या नव्या उड्डाणपुल व गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासंदर्भात खासदार प्रफुल पटेल यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यासोबत बैठक घेत चर्चा केली.यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी अधिक निधीची आवश्यकता निर्माण झाल्याने यावर मुख्य सचिव संजयकुमार यांच्यासोबतच्या हायपाॅवर कमिटीत चर्चा करुन निधी मंजुरीकरीता पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे बैठकित खा.पटेल यांनी सांगितले.गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालय इमारतीकरीता 2014-15 मध्येच 150 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले.त्यानंतर तयार करण्यात आलेला प्रस्ताव 450 कोटी रुपयाचा मंजूर करण्यात आला.परंतु गेल्या तीन चार वर्षात बांधकामाला सुरवात न झाल्याने त्याची किमंत 950 कोटीवर पोचल्याने वाढीव निधी मिळविण्यासाठी येत्या आठवड्यात मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येणार असे सांगितले.

सोबतच गोंदियाच्या दोन भागांना जोडणार्या रेल्वेलाईनवरील जुन्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी नवीन उड्डाणपुल बांधकामास मंजुरी मिळालेली आहे.मात्र त्या ठिकाणी उड्डाणपुल तयार करण्यासाठी जो नकाशा तयार करण्यात आला,त्यात तांत्रिक अडचणी असून त्या नकाशानुसार पुल तयार झाल्यास अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आढळून आल्याने नवीन नकाशा तयार करण्याच्या सुचना यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना दिल्या.यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन,गोंदियाचे जिल्हाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, कार्यकारी अभियंता अब्दुल जावेद, सहायक अभियंता रविकिरण परेलवार उपस्थित  होते.