भारताच्या संविधानाची प्रत प्रत्येकाच्या घरी असणे आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड

0
129

यवतमाळ, दि. १८ : देश संघटीत राहण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून या देशासाठी अतिशय बहुमुल्य योगदान दिले आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच आदी बाबींचे मार्गदर्शन या संविधानात आहे. तळागाळातील तसेच बहुजनांच्या विकासासाठी संविधान हे एक महत्त्वाचे शस्त्र आहे. त्यामुळे संविधानाची प्रत प्रत्येक भारतीयाच्या घरी असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

सहकार भवनात जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेद्वारे संविधान वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव, उपाध्यक्ष एकनाथ गाडगे, अशोक जयसिंगपूरे आदी उपस्थित होते.

भारतीय संविधान हा जगातील सर्वात अनमोल ग्रंथ आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, आपल्या घरी पोथी, पुराण, धार्मिक ग्रंथ असते. मात्र घराला, समाजाला आणि देशाला दिशा देणारे संविधान प्रत्येकाच्या घरी असणे आवश्यक आहे. भटके, अनुसूचित, मागासवर्गीय, बहुजनांसाठी संविधान अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या मनात संविधानाविषयी आदर असला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर बहुजन समाज कुठे असता, याची कल्पनासुध्दा करवत नाही. बाबासाहेबांच्या विचाराला बळकटी देण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाने करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, संविधान वाटप करून जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेने अतिशय स्त्युत्य उपक्रम राबविला आहे. यापूर्वीसुध्दा त्यांनी ग्रामगीतेचे वाटप केले होते. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली ही पथसंस्था राज्यात दखलपात्र ठरली आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो, या संकल्पनेनुसार राजूदास जाधव यांच्या नेतृत्वात पतसंस्थेची वाटचाल होत आहे. कोरोना संकटात या पतसंस्थेने गोरगरीबांसाठी अन्नधान्य किटवाटपासोबतच 20 लाखांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. तसेच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे काम या पतसंस्थेमार्फत होत आहे. समाजाच्या दु:खाची जाण असणारे राजूदास जाधव हे व्यक्तिमत्व आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जि.प.अध्यक्षा श्रीमती पवार म्हणाल्या, संविधान वाटप हा अतिशय चांगला उपक्रम असून नागरिकांमध्ये जनजागृतीकरिता असे उपक्रम होणे काळाची गरज आहे. तर जिल्हा उपनिबंधक श्री. कटके म्हणाले, संविधान हे केवळ वकिलांच्या हातातील दस्ताऐवज नसून प्रत्येक भारतीयाच्या परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. युगायुगाचे परिवर्तन हे संविधानाच्या माध्यमातून शक्य झाले. संविधान वाटपाचा हा पहिला कार्यक्रम यवतमाळमध्ये होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

पतसंस्थेचे सभासद नसलेल्या रामभाऊ चावके यांचा मृत्यू झाल्याने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून त्यांच्या पत्नी उज्ज्वला चावके यांना पतसंस्थेच्यावतीने पालकमंत्र्यांच्या हस्ते ५० हजारांचा धनादेश देण्यात आला. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते सभासदांना संविधानाच्या प्रतिचे वाटप करण्यात आले.

तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव यांनी केले. संचालन डॉ. दिलीप चौधरी यांनी तर आभार शेख लुकमान यांनी मानले. कार्यक्रमाला राजेंद्र पिंपळशेंडे, नंदेश चव्हाण यांच्यासह पतसंस्थेचे संचालक, सभासद आणि नागरिक उपस्थित होते.