वाशिम, दि. २1 : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने व अतिवृष्टी सोयाबीन, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झालेल्या मंडळात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही मंडळात अतिवृष्टी झाली नसली तरी परतीच्या पावसात सोयाबीन, कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत असून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. काही वृत्तपत्रांमध्ये जिल्ह्यातील नुकसानीच्या पंचनाम्याबाबत वृत्त प्रकाशित झाले असून या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिली.
ऑक्टोबर महिन्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे होत असलेल्या पीक नुकसानीचा जिल्हा प्रशासन, कृषि विभागाकडून वेळोवेळी आढावा घेत आहे. १७ ऑक्टोबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे. तसेच पंचनाम्याची सद्यस्थिती याबाबत सुद्धा माहिती घेऊन पुरेशी पथके तयार करून अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळातील पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या आणि त्याबाबतचा अहवाल लवकरात लवकर शासनाला सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
ज्या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली नसली तरी परतीच्या पावसाने सोयबीन पीक शेतातच भिजून खराब झाले आहे, कपाशीचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानीचीही प्राथमिक माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अहवालाच्या आधारे वाशिम जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ह्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. आकांक्षित जिल्हा म्हणून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून नुकसानभरपाई देण्याची मागणी करणार आहे. या संकटात शासन नक्कीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी म्हटले आहे.