रूग्णांच्या सुविधेसाठी कोविड हेल्प डेस्क व कॉल सेंटर सुरू

हेल्पलाईन नंबरवर कॉल करा ;; रूग्णांचे होणार समुपदेशन ;; ॲम्बुलन्सला जीपीएस सिस्टम

0
96

भंडारा दि.21: कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्याबरोबरच नागरिकांच्या मनातील कोरोनाची भिती दूर करण्यासाठी तसेच पॉझिटीव्ह रूग्णांना आरोग्य सुविधा वेळेवर मिळण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने सामान्य रूग्णालय येथे हेल्प डेस्क व कॉल सेंटर सुरू करण्यात आले असून या माध्यमातून रूग्णांचे समुपदेशन करण्यात येत आहे. नागपूर नंतर हेल्प डेस्क व कॉल सेंटर सुरू करणारा भंडारा हा विदर्भातील एकमेव जिल्हा आहे. समुपदेशना सोबतच नागरिकांच्या मनातील कोरोनाची भिती दूर करण्यासाठी हेल्प डेस्क व कॉल सेंटर सहाय्यभूत ठरणार आहे.

 ‘टुगेदर वुई कॅन’ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ही सेवा कार्यरत झाली असून सामान्य रूग्णालय भंडारा येथे भरती होण्यासाठी येणाऱ्या रूग्णांना आरोग्य सेवेसाठी हेल्प डेस्क मार्फत सहाय्य करण्यात येते. पॉझिटीव्ह असणाऱ्या रूग्णाला कोविड केअर सेंटर मध्ये ॲडमिट होते वेळी एक मास्क व सॅनिटायझर संस्थेद्वारे पूरविण्यात येते. गृह विलगीकरणात असलेल्या रूग्णांची यादी कॉल सेंटर व हेल्प डेस्क ला पुरविण्यात येते. त्या आधारे रूग्णांना एक, पाच व दहाव्या दिवशी कॉल करून त्यांच्या तब्येतीचा फिडबॅक घेण्यात येतो. रूग्णांना येणाऱ्या अडचणी व समस्यांबाबत जिल्हा प्रशासनाला अवगत करून रूग्णांना सहाय्यभुत सेवा प्रदान करण्यात येते.

आरोग्य किट विकत घेण्याची आर्थिक परिस्थिती नसलेल्या मात्र गृह विलगीकरणात असलेल्या रूग्णांना थर्मामिटर, पल्स ऑक्सिमीटर व अन्य साहित्य असणारी कीट संस्थेमार्फत पूरविण्यात येते. सदर किटचा उपयोग करून नंतर रूग्ण ती किट संस्थेला परत  करतात. त्याचा उपयोग अन्य रूग्णांना होऊ शकतो. त्याच प्रमाणे ज्या गावात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण जास्त आढळून येतात अशा गावातील सरपंचाकडे आरोग्य किट देण्याची व्यवस्था संस्था करणार आहे. कॉल सेंटरमध्ये येणाऱ्या कॉलला उत्तर देण्यासाठी व समुपदेशन करण्यासाठी तीन पाळीत कर्मचारी उपलब्ध आहेत. नागरिकांनी समुपदेशनासाठी 8421243585, 8421293585 या नंबरवर संपर्क करावा. तर कोविड हेल्प डेस्क सुविधेसाठी 8421353841 या क्रमांकावर संपर्क साधावा. ही सुविधा रूग्णांसाठी व अन्य नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

टुगेदर वुई कॅन संस्थेनी जिल्हयातील 16 अॅम्बुलन्सला जीपीएस सिस्टम बसवून दिली आहे. हेल्प डेस्क व कॉल सेंटरमुळे रूग्णांना सुविधा मिळण्या सोबतच आरोग्य सेवेचा फिडबॅक प्रशासनाला मिळणार आहे.

           कोविड-19 काळात आरोग्य प्रशासन करीत असलेल्या उपायोजना व प्रशासनाचे प्रयत्न या बाबतचा रूग्णांचा फिडबॅक तसेच समुपदेशन या साठी हेल्प डेस्क व कॉल सेंटर उपयुक्त आहे. कोरोना विषयी नागरिकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण या माध्यमातून करण्यात येणार आहे. नागरिकांनी मनात भिती न बाळगता निसंकोच आपले प्रश्न कॉल सेंटला विचारावे असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.