जिल्ह्यात सर्व प्रकारच्या मिरवणुका, रॅली, पथसंचालनावर बंदी

0
393

वाशिम, दि. २३ : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर, तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात दरवर्षी विजया दशमी, तिथीनुसार धम्मचक्र प्रवर्तन दिन व ईद-ए-मिलाद आदी सण, उत्सव साजरे करतांना काही संघटना, संस्थांकडून मिरवणूक, रॅली, पथसंचालनचे आयोजित केले जाते. त्यामुळे लोकांची गर्दी होते व सोशल डिस्टसिंगचे पालन होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात मिरवणूक, रॅली, पथसंचालन यावर बंदी घालण्यात आली आहे.

जिल्ह्यात अजूनही कोविड-१९ चे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, तरीही सर्वसामान्य नागरिक मास्कचा वापर, सोशल डिस्टसिंगचे पालन याविषयी आवश्यक खबरदारी घेत नसल्याचे पोलीस विभागाकडून होत असलेल्या दंडात्मक कारवायांच्या संख्येवरून दिसून येते. त्यामुळे कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी आगामी काळात मिरवणूक, रॅली, पथसंचालन तसेच गर्दी होणारे उत्सव, सोहळे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच सर्व सण, उत्सव वैयक्तिक स्वरुपात, घरगुती पद्धतीने साजरे करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कळम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता (१८६० चे ४५) कलम १८८ नुसार तसेच साथरोग अधिनियम १८९७ अन्वये दंडनीय, कायदेशीर कार्यवाही संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.