भंडारा,दि.23 -: शास्त्री चौक ते वरठी- तुमसर राज्य महामार्ग खराब व जीवघेणा झाल्यामुळे त्याचे त्वरित पुनर्निर्माण करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांच्या नेतृत्वात 4 नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता शास्त्री चौक भंडारा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना यासंदर्भातील निवेदन सर्किट हाऊस येथे देण्यात आले.त्यानंतर सहाय्यक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांना सुद्धा निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. सहाय्यक कार्यकारी अभियंता यांनी कोविड मुळे सर्व कामे स्थगित करण्यात आली. तर जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासमोर आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले दोन दिवसानंतर या कामाला सुरुवात होणार आहे.तेव्हा जिल्हाधिकारी यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी एका शिष्टमंडळाद्वारे कॉम्रेड हिवराज उके यांनी केली आहे.कामाला लवकरात लवकर सुरूवात न झाल्यास ४ नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे पत्रकात म्हटले आहे.शिष्टमंडळात भाकपचे जिल्हा सचिव काॅ.हिवराज उके, जनहित पॅंथर संघटनेचे अध्यक्ष राहुल बांते, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सुरेश खंगार, दिगंबर रामटेके, महेंद्र सहारे, एकलव्य सेनेचे संजीव भुरे व इंटरनॅशनल मानवाधिकार समितीचे रतन मंत्री सहभागी होते.