गोंदिया,दि.23ः-सीईओंचे दुर्लक्ष…जि.प.बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्याविना या मथळ्याखाली आज(दि.23) बेरार टाईम्सने बातमी प्रकाशित केल्यानंतर अखेर.. बांधकाम विभागाला प्रभारी कार्यकारी अभियंता मिळाले आहेत.विशेष म्हणजे प्रत्येक विभागाचा प्रभार सांभाळण्याचा अनुभव बांधकाम विभागाचा प्रभार मिळालेल्या कार्यकारी अभियंत्यांना आत्ता झाला आहे.यापुर्वी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा प्रभार त्यानंतर त्यांना सामान्य प्रशासन विभागाचाही प्रभार मिळालेला आहे.आता बांधकाम विभागाचा प्रभार मिळालेला आहे.विशेष म्हणजे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा प्रभार असताना त्यांच्या कार्यकाळात टेंडर घोटाळ्याचे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले होते.अशाप्रकारे जिल्हा परिषदेतील तीन विभागाचा प्रभार सांभाळण्याची संधी मिळणारे ते एकमेव अधिकारी ठरले आहेत.
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बदलून गेल्यानंतर त्या पदाचा प्रभार गोंदियाचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे आला.त्यानंतर त्यांनी सोडल्यानंतर हा प्रभार सडक अर्जुनी येथील उपविभागीय अभियंत्याकंडे गेला.त्यांनीही आपल्या सेवानिवृत्तीच्या अल्पावधीत आपल्यावर डाग नको म्हणून त्यांनीही आजारी होत तो प्रभार सोडल्यानंतर ते पद चार ते पाच दिवस तब्बल रिकामे राहिले होते.जेव्हा की 3 दिवसाच्यावर पद रिक्त ठेवता येत नव्हते यासंदर्भातील वृत्त आज बेरार टाईम्सने प्रकाशित केले होते.त्या वृत्ताची दखल प्रशासनाने घेत प्रकिया पुर्ण करुन लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रभार सोपविला.त्यांनीही आज प्रभार स्विकारत आढावा घेतला.त्या आढाव्याच्या वेळी मात्र एक खासगी इसम बसून होता,त्यांचा तिथे काय संबध अशी चर्चा एैकावयास मिळत आहे.