शिक्षण,आरोग्य,रोजगार निर्मितीसह लोक कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार- विनयकुमार मुन

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्विकारली

0
177

भंडारा दि.27 :  भंडारा सारख्या मागास जिल्ह्यातील ग्रामिणांचे जीवनमान उंचावण्यासोबतच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आरोग्याच्या चांगल्या सुविधा, युवक-युवती सोबतच महिलांना कौशल्यविषयक रोजगाराचे प्रशिक्षण देऊन विकासाला प्राधान्य देतांना लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येईल. असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार मुन यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर व्यक्त केले. आज श्री. मुन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा या पदाचा कार्यभार स्वीकारला.

अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझाडे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मनिषा कुरसंगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश जाधव, शिक्षण अधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, कार्यकारी अभियंती अर्चना घरडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नरेश कापगते व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पदभार स्वीकारताच श्री. मुन यांनी विभागाचा आढावा घेतला.

श्री. मुन पुढे म्हणाले, भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या तलावातून मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसायला चालना देऊन जिल्ह्यातील ढिवर समाज बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात येईल. अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यात येईल. प्रशासकीय सुधारणा करताना वक्तशीरपणा यावर आपला भर राहणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण तसेच ग्रामीण आरोग्याच्या सुविधा बळकट करण्याकडे लक्ष देण्यात येईल. बेरोजगार युवक-युवती तसेच महिला बचतगटांना उपजिविकेचे जास्तीत जास्त साधने उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना कौशल्य विषयक प्रशिक्षण देऊन त्यांच्या सक्षमीकरणावर आपला भर राहणार असल्याचे श्री.मुन यांनी सांगितले.

श्री मुन यांचा अल्प परिचय

श्री विनयकुमार यांची निवड 1995 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाकडून थेट उपजिल्हाधिकारी या पदावर झाली.         श्री मुन यांनी चंद्रपूर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष, सप्टेंबर 2020 रोजी केंद्र सरकारने त्यांची पदोन्नतीने भारतीय प्रशासकीय सेवेत निवड केल्यानंतर राज्य शासनाने त्यांची भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.