२० घरकूल लाभार्थ्यांच्या फाईल पडल्या रस्त्यावर

अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही टाळाटाळ : लाभार्थ्यांच्या नुकसानाचे काय

0
416

गोंदिया : सरकारी काम आणि थोडा वेळ थांब अशी म्हण प्रचलित आहे. असाच प्रकार उजेडात आला. शहरातील गोविंदपूर परिसरात अर्जुनी मोरगाव पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांच्या घरकुलाचे प्रस्ताव पडून होते. पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे शहर अध्यक्ष जय मेश्राम यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्याउपरही फाईल घेण्यास कुणी आला नाही. त्यामुळे त्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार तरी कसा? असा सवाल उपस्थित झाला आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून नागरिकांना राहण्याकरिता पक्की घरे बांधून देण्यात येत आहेत. त्याकरिता ग्राम पंचायतींकडून नावे मागविण्यात येतात. अर्जुनी मोरगाव पंचायत समितीअंतर्गत लाभार्थ्यांच्या नावाची यादी तयार करण्यात आली. त्या प्रस्तावांना पंचायत समितीने मंजूरी दिली. ते प्रस्ताव विशेष समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्याकरिता नेण्यात आले. मात्र त्या प्रस्तावांपैकी तब्बल २० प्रस्तावांचा गठ्ठा गोंदिया शहरातील गोविंदपूर परिसरात रस्त्यावर पडलेला आढळला. सुज्ञ नागरिकांनी कामाचे कागद असल्याने ते प्रस्ताव पिपल्स रिपब्लीकन पक्षाच्या कार्यालयात नेवून दिले. रिपब्लीकन पक्षाचे शहर अध्यक्ष जय मेश्राम यांनी लाभार्थ्यांशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्याचा क्रमांक घेतला. मेश्राम नावाच्या अभियंत्यासोबत बोलून या प्रस्तावांची माहिती देत प्रस्ताव घेवून जाण्याचा आग्रह केला. परंतु अद्यापही ते प्रस्ताव नेण्यास कुणीही आला नाही. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना लाभ मिळावा, याकरिता किती प्रयत्नशील आहेत, याचा परिचय येतो. प्रस्ताव पारीत करण्याकरिता साहेब पाच हजार रुपये मागत असल्याची कैफियत या प्रस्तावापैकी एका लाभार्थ्याने मांडली. आज ना उद्या घरकूल मिळेल, या अपेक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना प्रस्तावच गहाळ झाल्याने लाभ कसा मिळेल, असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात अर्जुनी मोरगावचे गटविकास अधिकारी वलथरे यांच्याशी संपर्क केला असता असा प्रकार घडला असल्यास तो गंभीर आहे. तातडीने विचारपूस करून ते प्रस्ताव परत आणण्याच्या सूचना देण्यात येतील असे सांगतीले.

या लाभार्थ्यांचे आहेत प्रस्ताव

गोविंदपूर परिसरात सापडलेल्या घरकुलांच्या प्रस्तावांच्या गठ्ठयात गुलाब बावने, एकनाथ राऊत, मंगेश दिघोरे, लेखराम वलथरे, विलास वलथरे, संदीप दिघोरे, सुदाम सोनटक्के, देवानंद मेश्राम, गोपिका मेश्राम, रेशीमनाथ कोसरे, भक्तप्रल्हाद भोयर, प्रमोद दिघोरे, गणेश मेश्राम, शालीकराम मेश्राम, सिता दिघोरे, मोहनलाल भानारकर, कुंडलीक नेवारे, गणेश ठाकरे, रविंद्र दिघोरे आदी लाभार्थ्यांचा समावेश आहे.