गोरेगाव,दि.29ः-खरीप हंगामातील धानाला एक हजार रूपये बोनससह एकरी १७ क्विंटल धान विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
शासनाने मागील वर्षी दिलेला हमीभाव अतिशय कमी ‘अ’ ग्रेड धानाला १८३५ रुपये व सर्वसाधारण १८१५ रुपये होता. यावर्षी नव्याने त्यात प्रतिक्विंटल ५३ रूपयांची वाढ करण्यात आली आहे.बोनसकरीता 50 क्विंटलची मर्यादाही ठेवण्यात येऊ नये असे म्हटले आहे.
एकीकडे रासायनिक खत व इतर खतांचे भाव वाढलेले असून शेती उपयुक्त औषधी, मजुरांचे दरही वाढलेले आहेत. तसेच शेती उपयोगी ट्रॅक्टर, ट्रेलर व इतर सामुग्री, डिझेलचे दर वाढलेले आहेत.सतत पाऊस, पूर, रोगांचा प्रादुर्भाव तसेच खते, औषधी, खताच्या वाढलेल्या दरामुळे भात शेती करणे परवडत नाही. शेतात मध्यम प्रतीचे धान एकरी १५-१७ क्विंटल तर सर्वसाधारण धान एकरी २0 ते २५ क्विंटल उत्पन्न होत आहे. मात्र हमीभाव केंद्रावर फक्त १3 क्विंटल धान खरेदी करीत असून त्याला बोनस मिळतो. उर्वरीत धान अतिशय कमी दराने शेतकर्यांना विक्री करावे लागत आहे. त्यामुळे सरकारने यावर्षी एकरी १७ क्विंटल धान खरेदी करण्याच्या आदेशासह प्रतिक्विंटल १ हजार रूपये बोनस जाहीर करावा, अशी मागणी मोरेश्वर कटरे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.