रब्बीसाठीही शेतकऱ्यांनी पीक विमा घ्यावा : जिल्हाधिकारी दीपक सिंगला

0
159

गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.29 : जिल्हयात रब्बी हंगामात उन्हाळी भातासह, हरभरा, बागायती गहू आणि ज्वारी काही तालुक्यांमध्ये घेतली जाते. या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती, किड आणि इतर रोगांसारख्या अकस्मिक प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी 2020-21 सुरू करण्यात आली आहे. या पीक विमा योजनेचे मुख्य वैशिष्टये म्हणजे विमा एकांश स्तरावर नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात आलेली घट आणि अन्य अधिसूचित जोखिमांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई देण्यात येणार आहे. पॉलिसीचे नियम आणि अटींच्या अनुसार ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उत्पादन घेणारे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यासासठी पात्र असणार आहेत.

पिक विमा घेण्यासाठीची प्रक्रिया : सदर योजनेअंतर्गत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत (कोरडवाहू ज्वारी) दि. 30 नोव्हेंबर, (हरभरा, बागायती गहू) 15 डिसेंबर आणि (उन्हाळी भात) 31 मार्च 2020 पर्यंत आहे. शेतकरी आपला विमा प्रस्ताव बँक, आपले सरकार सेवा केंद्र, सहकारी संस्था, वैयक्तिक ऑनलाईन अर्जाद्वारे केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर (www.pmfby.gov.in) किंवा विमा कंपनी इफ्को-टोकियो जनरल इन्सुरन्स कंपनीच्या नजीकच्या कार्यालयात विमा प्रस्ताव सादर करू शकतात. सदर विमा प्रस्तावासोबत शेतकऱ्यांनी आपले बचत खात्याचे पासबुकची एक प्रत, आधार कार्ड, पीक पेरा, सात बारा उताऱ्याची प्रत इत्यादी कागदपत्र सादर करावीत. सदर विमा प्रस्ताव सादर करत असताना शेतकऱ्यांनी विमा हाप्त्याची रक्कम सोडून इतर कोणतेही शुल्क अदा करू नये.

अधिसूचित पिकांसाठी रब्बी हंगामातील जोखमीच्या बाबी : यामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्री वादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूसंखलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी कारणामुळे उत्पन्नात येणारी घट. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत इफ्को-टोकियो जनरल इन्शूरन्स कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800-103-5490 यावर माहिती देणे आवश्यक आहे. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी विमा संरक्षित क्षेत्रामध्ये पीक बदलाबाबतची माहिती किंवा सूचना बँकेला विमा नोंदणीच्या अंतिम दिनांक पुर्वी दोन कार्यालयीन दिवस आधी देणे आवश्यक आहे.

नुकसान झाल्यास काय करावे : एखाद्या शेतकऱ्याचे जोखमीमूळे नुकसान झाल्यास त्याने इफ्को-टोकियो जनरल इन्शूरन्स कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800-103-5490 यावर 72 तासाच्या आत माहिती देणे आवश्यक आहे. तसेच क्रॉप इन्शुरन्स या मोबाईल ॲपवर किंवा शासनाच्या (www.pmfby.gov.in) संकेतस्थळावर किंवा संस्थेच्या ईमेलवर ही नुकसानीची माहिती देता येते.

गडचिरोली जिल्हयातील अधिसूचित पिकांसाठी 2020-21 या वर्षासाठी
• गहू बागायती साठी प्रति हेक्टर 24 हजार रू. विमा रक्कम असून याच्या दीड टक्के म्हणजे 360 रू. प्रति हेक्टर प्रीमीयम भरावयचा आहे.
• हरभऱ्यासाठी आणि ज्वारी कोरडवाहू साठी प्रति हेक्टर 16 हजार 250 रू. विमा रक्कम असून याच्या दीड टक्के म्हणजे 244 रू. प्रति हेक्टर प्रीमीयम भरावयचा आहे.
• उन्हाळी भातासाठी प्रति हेक्टर 31 हजार 875 रू. विमा रक्कम असून याच्या दीड टक्के म्हणजे 478 रू. प्रति हेक्टर प्रीमीयम भरावयचा आहे.

जिल्ह्यातील अधिसूचित महसूल मंडळ : उन्हाळी भातासाठी कुरखेडा, आरमोरी, सिरोंचा व वडसा महसूल मंडळांचा समावेश आहे. हरभरा पीकासाठी कुरखेडा, कढोली, पुराडा, वडेगाव, कोटगुल, म्हसेली, आरमोरी, देऊळगाव, वैरागड व पिसेवडधा महसूल मंडळांचा समावेश आहे. जिरायत ज्वारीमध्ये गडचिरोली, पोर्ला, बामणी, येवली, आरमोरी, देऊळगाव, वैरागड, चामोर्शी, कुनघाडा रै., घोट, येणापूर, आष्टी, मुलचेरा, सिरोंचा, सिरोंचा बामणी, पेंटी पाका, असरअल्ली, अहेरी, आलापल्ली, जिमलगट्टा, पेरीमिली व पिसेवडधा महसूल मंडळांचा समावेश आहे. गहू बागायत मध्ये कुरखेडा, कडोली आणि पुराडा महसूल मंडळांचा समावेश आहे.

पीक विमा प्रचार प्रसिद्धी बाबत जिल्हयात चित्ररथांचे आगमन : जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते जिल्हयात दाखल झालेल्या दोन चित्ररथांना हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. हे चित्ररथ जिल्हयात सर्व तालुक्यात पीक विमा बाबत गावस्तरावर माहिती देणार आहेत. यावेळी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद , भाऊराव बऱ्हाटे जिल्हा कृषी अधीक्षक , युवराज टेंभूर्णे जिल्हा अग्रणी बँक, वसवाडे कृषी उपसंचालक, दिक्षांत कोडप कृषी विकास अधिकारी, शीतल खोबरागडे कृषी अधिकारी कृषी, तसेच राकेश वायलालवार विमा कंपनी जिल्हा समन्वयक उपस्तीत होते.