
गोंदिया,दि.30 – कोरोना रुग्ण बरे झाल्यावर अशा रुग्णांना भविष्यात शारिरीक समस्या उदभवतात. त्यामध्ये श्वसनाशी निगडीत समस्या, हातापायात कमजोरी येणे, अस्वस्थ वाटणे या समस्या लक्षात घेता, 29 ऑक्टोबरपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे जिल्हाधिकारी, अधिष्ठाता डॉ.एन.जी.तिरपुडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप गेडाम यांच्या प्रयत्नाने ‘पोस्ट कोविड फिजिओथेरपी सेंटर’ सुरु करण्यात आले आहे. कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर या सेंटरवर श्वसन विकार रुग्णांना त्यांच्या समस्यानुसार उपचार केले जातील.
‘पोस्ट कोविड फिजिओथेरपी सेंटर’ दररोज सकाळी 11 पासून दुपारी 1 पर्यंत (सार्वजनिक सुट्टया वगळून) सुरु राहणार असून त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथील फिजिओथेरपीस्ट डॉ.मिनल गेडाम, डॉ.नोविनो सुर्यवंशी तसेच ऑक्युपेशनल तज्ञ डॉ.हेमलता गिते रुग्णांवर उपचार करतील.
उदघाटन कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ.एन.जी.तिरपुडे, डॉ.व्हि.पी.रुखमोडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप गेडाम, सहायक अधिक्षक डॉ.संजयकुमार माहुले, डॉ.जयस्वाल व फिजिओथरपीस्ट विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.