तुमसर,दि.31ःराज्यातील ओबीसी प्रवर्गातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा महासचिव गौरीशंकर मोटघरे यांनी सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, त्यांना भाड्याने राहता यावे यासाठी निर्वाह भत्ता देण्याची योजना राज्य सरकारने १७ जून २0१८ ला सुरू केली. या योजनेचे ‘भारतर% डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ असे नामकरण झाले. त्यानुसार अनुसूचित जातीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी निर्वाह भत्ता म्हणून साठ हजार रुपये देण्यात येतात. पुढे याच योजनेत अनुसूचित जमाती, मराठा समाज आणि धनगर समाजातील विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.
गावखेड्यात ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. परंतु आर्थिक अडचणी असल्याने त्यांना उच्च शिक्षण घेता येणे शक्य नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अनुसूचित जमाती, मराठा समाज व धनगर समाजाप्रमाणे ओबीसींना समाविष्ट करून विद्यार्थ्यांना निवास, जेवण, निर्वाह भत्तासाठी प्रतिवर्ष साठ हजार रुपये स्वाधार योजने अंतर्गत देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा महासचिव गौरीशंकर मोटघरे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.