सालेकसा,दि.03ः-गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या यादीत नेहमी अग्रेसर असणारा हाजरा फॉल मागील मार्चपासून बंद ठेवण्यात आला होता covid-19 प्रसारा ला आळा घालण्यासाठी सर्व पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु एक नोव्हेंबर पासून सर्व पर्यटनस्थळे सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील हाजराफॉल सुद्धा सुरू करण्यात आला. यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत इलमकर यांनी प्रेस नोट च्या माध्यमातून सर्व प्रसार माध्यमांना व पर्यटकांना हजराफॉल भेटीसाठी आमंत्रित केले. नवाटोला वन व्यवस्थापन समिती तर्फे ही पहिल्या दिवशी पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली. नवीन रंगरंगोटी, सेल्फी पॉइंट, नवीन कॅफे, मचान, सुसज्ज पार्किंग व सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तैनात करण्यात आली. पहिल्या दिवशी पर्यटक येणार की नाही? केलेली सगळी तयारी कमी तर नाही पडेल? असे सवाल वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या व कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होऊ लागला परंतु पहिल्याच दिवशी पाहता पाहता 365 पर्यटकांनी हजेरी लावली यात गोंदिया जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातूनही पर्यटक भेटीला आले होते शिवाय छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येत प्रेक्षक हाजराफॉल बघण्यास उपस्थित झाले होते.
शासनाच्या निकषानुसार एका सोबत 200 लोकांपेक्षा जास्त नागरिकांना हजेरी लावता येणार नाही. 65 वर्षावरील नागरिकांना पर्यटन स्थळावर येता येणार नाही. प्रत्येक वाहनात सॅनिटायझर असणे बंधनकारक असणार. पर्यटन स्थळावर फिरत असतांना मास्कचे वापर करणे बंधनकारक असणार. या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत हाजराफॉल मध्ये एकही नियम उल्लंघन केल्याचे घटना निदर्शनास आली नसल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ईलमकर यांनी दिली.