गडचिरोली,,दि.06 : नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची घोषणा झाली असून 1 डिसेंबर रोजी जिल्ह्यात 21 मतदान केंद्रावर पदवीधर साठी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी पत्रकार परिषदेद्वारे निवडणूक तयारीबाबत माहिती दिली. दि. 05 नोव्हेंबर रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर 12 नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे. 13 नोव्हेंबरला नामनिर्देशन पत्रांची छाननी केल्यानंतर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे. पदवीधर मतदार संघाची प्रत्यक्ष मतदान 1 डिसेंबर रोजी मतपत्रीकेद्वारे होणार आहे. या दिवशी 12391 पदवीधर मतदार हे सकाळी 8.00 वा. पासून सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत मतदान करु शकणार आहेत.
जिल्ह्यात आचरसंहिता लागू :- जिल्ह्यात पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीमूळे आचरसंहिता लागू झाली आहे. या काळात कोणतेही नवीन काम सुरु करता येणार नाही. तसेच नवीन कार्यादेश तसेच नवीन निविदा काढता येणार नाही. या काळात आचार संहितेमुळे फक्त यापुर्वी मंजूर असलेली व सुरु असलेली कामे करता येणार आहेत. राजकीय लोकप्रतिनिधी यांना बैठका, आढावा बैठका घेता येणार नाहीत. लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकांप्रमाणेच या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्ह्यात 21 ठिकाणी मतदान :- गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर मतदारांसाठी प्रत्येक तालुक्यात तहसिल कार्यालयात एकूण 21 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत. यामध्ये मतदान केंद्र 17 व सहाय्यकारी मतदान केंद्र 4 आहेत. यामध्ये देसाईगंज-2, कुरखेडा-2, कोरची -1, आरमोरी -2, गडचिरोली -5, धानोरा -1, चामोर्शी-2, मुलचेरा-1, एटापल्ली-1, अहेरी-2, भामरागड-1 व सिरोंचा येथे 1 मतदान केंद्र असे एकूण 21 ठिकाणी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्र हे तहसिल कार्यालयातच उभारले जाणार आहे.
जिल्ह्यात ‘पदवीधर’ साठी 12391 मतदार :- गडचिरोली जिल्ह्यात एकूण 12391 पदवीधर मतदारांनी नोंद केली आहे. यामध्ये पुरुष मतदार 8954 आहेत, महिला मतदार 3436 तर एक इतर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी पदवीधर मतदार नोंदणी 737 ने कमी असली तरी नागपूर विभागाच्या तुलनेत जिल्ह्यातील नोंदणी मधील घट कमी आहे. मतदार यादी निवडणूक विभागाकडून अंतिम स्वरूपात अद्यावत प्रसिद्ध होणार आहे यामध्ये थोड्या प्रमाणात वाढ होऊ शकते. जिल्हास्तरावर पदवीधर निवडणूकीबाबत तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सदरच्या निवडणूकीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक शाखेत कंट्रोल रुमची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी मतदारांना मदत करणे, तक्रारींची नोंद घेणे तसेच आचारसंहितेचा भंग याबाबत माहिती दिली व घेतली जाणार आहे. या ठिकाणी 07132-222086 या क्रमांकावर नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन निवडणूक शाखेकडून करण्यात आले आहे. तसेच पेडन्यूज, माध्यम प्रमाणिकरण करणेबाबत जिल्हा माहिती कार्यालयात कक्ष (MCMC) स्थापन करण्यात आला आहे.
मतदान प्रक्रिया ही मतपत्रीकेद्वारे होणार असून मतदारांनी यावेळी मतदान ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र नसेल तर छायाचित्र असलेले इतर ओळखपत्र यात पासपोर्ट, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पदवी, पदवीधर प्रमाणपत्र, बँका/ पोस्ट पासबुक, रेशनकार्ड (छायाचित्रसह असलेले), किंवा आधारकार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करणे गरेजेचे आहे.
कोविडबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन :- सद्या कोरोना संसर्ग असल्यामुळे प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मोमीटर, सॅनिटायझर, शाररीरीक आंतर राखण्यासाठी आखण्यात आलेली व्यवस्था तसेच इतर आनुषंगिक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. मतदारांनी मास्कचा वापर करावा व या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. नोकरीनिमित्त बाहेर असलेले, मतदान प्रक्रियेतील कर्मचारी व त्या वेळी कोरोना बाधित असलेल्यांना पोस्टल बॅलेट द्वारे मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
जिल्हास्तरावरुनच आवश्यक परवानग्या : गाव तसेच शहरांमध्ये रॅली, गाडयांबाबत किंवा इतर अनुषंगिक परवानग्या जिल्हास्तरावरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येणार आहेत. उमेदवार तसेच इतर नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेबाबत किंवा इतर अनुषंगाने परवानगीसाठी जिल्हा कक्षाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कळविले आहे.