कोविड कॉल सेंटरमधून 3878 रूग्णांना कॉल

मनातील भीती दूर करण्यात यश ;;; अनेक तक्रारीचा निपटारा ;; रूग्णांचे समुपदेशन

0
176
????????????????????????????????????

भंडारा दि. 07 : कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत असला तरी अजूनही नागरिकांच्या मनात भीती आहेच. ही भीती दूर करण्यासाठी तसेच रूग्णांचे समुपदेशन व तक्रारी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या कॉल सेंटरमधून 3878 रूग्णांना कॉल करून त्यांचे समुपदेशन करण्यासोबतच असंख्य  तक्रारीचा तात्काळ निपटारा करण्यात आला आहे. रूग्णांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करण्यासाठी ‘कोविड कॉल सेंटर’ उपयुक्त ठरले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना संसर्गमुक्मीसाठी प्रशासनाने प्रयत्नाची पराकाष्टा केली. मात्र यंत्रणेतील त्रुटी व रूग्णांचा फिडबॅक तसेच कोरोनाबाबतचे समुपदेशन याबाबतची माहिती प्रशासनाला उपलब्ध होत नव्हती. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने हेल्प डेस्क व कॉल सेंटरची निर्मीती केली. सामान्य रूग्णालय येथे हेल्प डेस्क स्थापन करून रूग्णांना रूग्णालयात भरती करण्यापासून ते डिस्चार्ज पर्यंतच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याचा फायदा रूग्णांसह नातेवाईकांनाही झाला.

त्याच प्रमाणे गृह विलगीकरणात असलेले रूग्ण व कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या रूग्णांना मिळणाऱ्या सुविधा, औषधोपचार व समुपदेशन साठी कोविड कॉल सेंटर  निर्माण करण्यात आले. या केंद्रातून 14 ऑक्टोंबर ते 5 नोव्हेंबर या 23 दिवसांच्या कालावधीत 3878 रूग्णांना कॉल करण्यात आले. सुविधाविषयी समाधान व्यक्त करण्यासोबतच नागरिकांनी या संवादा दरम्यान आपल्या समस्याही मांडल्या. त्या समस्यांची प्रशासनाने तातडीने दखल घेतली.

कोविड कॉल सेंटरच्या माध्यमातून प्राप्त तक्रारीत सर्वाधिक तक्रारी पवनी तालुक्यातून प्राप्त झाल्या. यात प्रामुख्याने कोविड केअर सेंटरमधील आहार बाबतच्या तक्रारीचा समावेश आहे. मांगली आसगाव येथील रूग्णांनी दु‍षित पण्याबाबत अडचणी सांगितल्या. साकोली मधुनही आहाराबाबत काही प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या या सर्व तक्रारीचा तातडीने निपटारा करण्यात आला. रूग्ण व प्रशासन या मधील संवाद सेतुचे काम कॉल सेंटर करीत आहे. ‘टुगेदर वुई कॅन’ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ही सेवा कार्यरत आहे. जिल्हाधिकारी यांनी भेट दिली त्यावेळी संस्थेचे पंकज सारडा, वंदना सारडा, वंदना अंबोलकर व कॉल सेंटरचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तक्रारींचा फिडबॅक तात्काळ द्या- जिल्हाधिकारी

कोविड केअर सेंटरमधील सुविधा व उपचारा बाबत रूग्णाच्या समस्या ठेट आपल्याला सांगाव्यात त्याची तात्काळ दखल घेवून सोडविल्या जातील अशा सुचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कोविड कॉल सेंटरला दिल्या. रूग्णांची समुपदेशन व्यवस्थित व्हावे व कोरोना विषयीची भीती दूर व्हावी या साठी कॉल सेंटर उपयुक्त ठरत आहे. कॉल सेंटरमधून येणाऱ्या कॉलला प्रतिसाद देऊन आपला अभिप्राय नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.