बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत वर्धा-सेवाग्राम रस्ता रुंदीकरण कामाचा आढावा

0
48

वर्धा, दि. 12 : सेवाग्राम आश्रमाजवळील रेल्वे ब्रिज ते डॉक्टर कॉलनी या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री  अशोक चव्हाण यांनी वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत घेतला. रेल्वे ब्रिज ते डॉक्टर कॉलनी या रस्त्यावरील वाहतूक नियमनाबद्दलचा अहवाल आयआयटी पवईकडून घ्यावा, अशी सूचना मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी केली.

वर्धा ते सेवाग्राम रस्त्याच्या प्रलंबित कामासंदर्भात बुधवारी मंत्रालयात आढावा बैठक झाली. त्यावेळी माजी राज्यमंत्री व  आमदार रणजित कांबळे, सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे, नागपूर विभागाचे मुख्य अभियंता यांच्यासह महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

वर्धा ते उमरेड रोड या 50 किमी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हायब्रिड ॲन्युईटीअंतर्गत सुरू आहे. यामधील बापूकुटीजवळील रेल्वे ब्रिज ते डॉक्टर कॉलनी या मार्गाचे काम थांबले आहे. यासंदर्भात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी. त्यामध्ये झाडे न कापता पर्यावरणाच्या अनुषंगाने विचार करून रस्त्याचे काम कसे करता येईल, झाडांचे पुनर्रोपण करता येईल का, ते पहावे. अशी सूचना चव्हाण यांनी केली. झाडांच्या वयासंबंधी वन विभागाकडून सविस्तर अहवाल घ्यावा. तसेच या भागातील वाहतुकीच्या अनुषंगाने ड्रोन सर्व्हे करून त्यासंबंधीचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.  या भागातील वाहतूक नियोजनासंदर्भात व पर्यायी वाहतुकीसंदर्भात आयआयटी पवईकडून अहवाल घेऊन यावर चर्चा करावी आणि या बैठकीत होणाऱ्या चर्चेच्या अनुषंगाने राज्य शासनास अहवाल सादर करावा. यानंतर राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल. तुर्तास कोणतेही झाड तोडू नये, अशा सूचनाही  चव्हाण यांनी यावेळी केल्या.

तुषार गांधी यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने काय उपाययोजना करता येईल, यासंबंधी सचिव (रस्ते) यांनी प्रस्ताव सादर करावा, असेही  श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. केदार म्हणाले की, रस्ता रुंदीकरण करत असताना सेवाग्राम आश्रमाला अथवा परिसरातील ऐतिहासिक वस्तूंना कोणताही धक्का लागू देणार नाही. तसेच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडांची हानी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

श्री. कांबळे यांनी सांगितले की, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे. हे करत असताना आश्रमाच्या परिसराची कोणतीही हानी होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. रुंदीकरणात जाणाऱ्या झाडांऐवजी नवीन झाडे लावण्यात येत असल्याचे ते म्हणाले.