34.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ हरभरा पिक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा- हिंदूराव चव्हान

हरभरा पिक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा- हिंदूराव चव्हान

0
89

भंडारा दि.12:- पिकांची उत्पादकता वाढावी यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिक स्पर्धा  योजनेत भंडारा जिल्ह्यातील हरभरा पिकाचा समावेश करण्यात आला असून रब्बी हंगामातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी आधिकारी हिंदूराव चव्हान यांनी केले आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अदयावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उददेश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे .

सदर स्पर्धा एकाच वर्षात आयोजित करावयाची आहे. यामध्ये शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षीसे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तालुका पातळीवर प्रथम रुपये 5,000, व्दितीय रुपये 3,000, तृतीय रुपये 2,000, जिल्हा पातळीवर प्रथम रुपये 10,000, ब्दितीय रुपये 7,000, तृतीय रुपये 5,000, विभाग पातळीवर प्रथम रुपये 25,000, व्दितीय रुपये 20,000, तृतीय रुपये 15,000, राज्य पातळीवर प्रथम रुपये 50,000, व्दितीय रुपये 40,000, तृतीय रुपये 30,000 बक्षीसाचे स्वरूप निर्धारीत केलेले आहे.

सदर स्पर्धेमध्ये भंडारा जिल्हयासाठी हरभरा या रब्बी पिकाचा समावेश केलेला आहे. पिकस्पर्धेतील पिकाची निवड करतांना तालुक्यातील क्षेत्र किमान 1000 हेक्टर असावे. पिकस्पर्धेसाठी सर्व शेतकऱ्यांना भाग घेता येईल. स्पर्धेमध्ये भाग घेताना शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर 0.10 है. पेक्षा जास्त जमीन असली पाहीजे व जमीन ते स्वत: कसत असले पाहिजे. स्पर्धेसाठी शुल्क सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी रक्कम रुपये 300 राहील. स्पर्धेकरिता अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीकरिता कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, हिंदूराव चव्हान यांनी केले आहे.