सीईओ साहेब…..जि.प.चे कुलूपबंद व्दार तरीही पीओपीचे पत्रे गायब

0
717

गोंदिया,दि.18:कोरोनाचा संसर्ग त्यातही…मुख्य प्रवेशव्दार सोडले तर सर्व प्रवेशव्दारावर कुलूप जडलेले असताना पदाधिकारी यांच्या कक्षासमोरील छताच्या पीओपीचे पत्रे,पंखे आणि इलेक्ट्रिक साहित्य चोरीला गेलेच कसे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.रात्रीला पोलीस विभागाचा कर्मचारी हा बंदोबस्तात असतो सोबतच जिल्हा परिषदेचे कर्मचारीही असतात मग पत्रे बेपत्ता कसे झाले की पीओपीच्या पत्र्यांची चोरी कशी झाली असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.जिल्हा परिषदेने लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये पत्रे,वायर व पंखे काढणारा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला काय आदी प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत सीईओ साहेब कुलूपबंद व्दार तरीही पीओपीचे पत्रे गायब कसे म्हणायची वेळ आलेली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमध्ये गेल्या सहा सात महिन्यापुर्वीच पदाधिकारी यांचे कक्षाशेजारील व सीईओ यांच्या कक्षाशेजारील वर्हाड्यांत पीओपीचे काम करण्यात आले.नवी वायरींग,पंखे आणि पीओपीसाठी लाखो रुपये खर्च होऊन वर्ष ही लोटायला असतानाच एप्रिल महिन्यात आलेल्या हलक्या वार्यात प्रवेशव्दारासमोरील पीओपी उखडून बाहेर पडली,त्याचवेळी कामाच्या निकृष्ठतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते.आत्ता तर सध्या कोरोना संसर्ग असताना जिल्हा परिषदेत आवागमन कमी आहे.कोरोनाचा संसर्ग जिल्हा परिषदेत होऊ नये साठी उपाध्यक्ष व कृषी सभापती यांच्या कक्षाशेजारील बाहेर जाण्याचा प्रवेशव्दार गेल्या तीन चार महिन्यापासून बंद पडलेला आहे.सोबतच वित्त विभागाकडीलही प्रवेशव्दार बंद असताना उपाध्यक्ष व कृषी सभापती यांच्या कक्षादरम्यान लावण्यात आलेल्या पीओपीचे पत्रे,वायरींग आणि पंखे सुध्दा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारला(दि.17) बघावायस मिळाले.बांधकाम विभागाच्या माहितीनुसार या पीओपीचे काम पेटी काँन्ट्रक्टर म्हणून शकील नामक कंत्राटदाराने केले होते.त्यांनीच पुर्ण जिल्हा परिषदेच्या पीओपीचे काम तत्कालीन अतिरिक्त मुकाअ हाशमी यांच्या मदतीने केले होते.तेव्हापासून या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पदाचे प्रभार सीईओनी सोपवले.त्यानंतरच्या पहिल्याच बांधकाम विभागाचा आढावा ज्यादिवशी प्रभारी कार्यकारी अभियंत्यानी घेतला होता,त्यादिवशी सदर पेटी काँन्ट्रक्टरसुध्दा त्यावेळी हजर राहिल्याची चर्चा आत्ता एैकायला मिळू लागली आहे.

विशेष म्हणजे या कक्षाची रंगरंगोटी व दुरुस्ती एक दिड वर्षापुर्वीच करण्यात आल्याचे बोलले जाते. जिल्हा परिषदेत अधिकारी व पदाधिकारी यांच्या कक्षाचे नुतनीकरण अधिकारी व पदाधिकारी बदलताच नेहमी करण्यात येते. त्याकरिता आपल्या खास कंत्राटदारांना अधिकारी हे काम देण्यासाठी आटापिटा करतात. परंतु कक्षाची रंगरंगोटी, पीओपी व त्या वापरले जाणारे विद्युत साहित्य या सर्वांची गुणवत्ता योग्य आहे की नाही हे कुणीच तपासत नसल्याने निकृष्ठ दर्जाचे साहित्य ही वापरले जात असल्यानेच अशा आगीच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.

पुर्ण प्रशासकीय इमारतीतील पोर्चचे विद्युतीकरण व पीओपीचे काम निघाले होते.एक पीओपीचे काम 15 लाख रुपयाचे होते.त्यात एलईडी लावण्याचे काम 12 लाख रुपयाचे होते त्याचे ईटेंडर निघाले होते.तो टेंडर भरणार्याला बोलावून चमकवण्यात आले होते.  त्या कंत्राटदारालाही नंतर धमकावत हे तु काम करायच नाही आम्हाला आमच्या एका कंत्राटदाराला द्यायचे आहे अशी दमदाटी ही करण्यात आल्याची चर्चा त्यावेळी जोमात होती.त्यातच निकृष्ठ बांधकाम आणि आत्ता गायब झालेल्या पत्र्यामुळे जिल्हा परिषदेची गुणवत्ता व सुरक्षाच वार्यावर आलेली आहे.गेल्या वर्षभरात आणि सध्या सुरु असलेल्या सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या कार्यालयात करण्यात आलेल्या रंगरंगोटी, पीओपी व विद्युती करणात वापरलेल्या साहित्याच्या चौकशीसोबतच गायब झालेल्या साहित्याच्या चौकशी साठी समिती नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. या चौकशीत ज्या कंत्राटदाराने गुणवत्तापूर्ण साहित्याचा वापर केला नसेल अशा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी व विद्ममान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पारदर्शक प्रशासनात करतील काय याकडे लक्ष लागले आहे.