१ ऑक्टोबरला ग्रा.पं.च्या किल्ल्या बिडीओंना सोपविणार
गोंदिया दि. १६: आपल्या विविध मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या बॅनरखाली जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक सहभागी झाले होते. मागण्या पूर्ण न झाल्यास १ ऑक्टोबर रोजी ग्रा.पं.च्या किल्ल्या गटविकास अधिकार्यांना देणार असल्याचा इशारा ग्रामसेवकांनी दिला.
ग्रामसेवक युनियनने केलेल्या मागणीत योगेश रूद्रकार यांना तातडीने कामावर रूजू करा, ग्रामविकास अधिकार्यांना पदोन्नतीतून विस्तार अधिकार्यांची पदे भरा, ग्रामसेवकांच्या पदोन्नतीने ग्रामविकास अधिकारी पद भरा, सन २0११ ते २0१४ या वर्षात आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून एकाची निवड करा, १२ व २४ वर्षाचे कालबद्ध पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढा, अस्थायी ग्रामसेवकांना स्थायी करा, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची सन २0१३ व २0१४ ची सेवाजेष्ठता यादी प्रकाशित करा, नोव्हेंबर २00५ पूर्वी लागलेल्या कंत्राटी ग्रामसेवकांचे सीपीएफअंतर्गत कपात करण्यात आलेल्या रकमेचा भविष्य निर्वाह निधीत वळती करा, ३ वर्षे पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांना सुरक्षा निधीचे १0 हजार रूपये परत द्या, आंतरजिल्हा बदली प्रकरणे निकाली काढा, अश्या विविध मागण्यांचा समावेश होता.
सदर धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण, एम. रहिले, पी.जी. ठाकरे, रेखा ठाकरे, वाय.डी.पुंड, आर.बी. बावनकुळे, सी.आर. काडगाये, वाय.एस. मानापुरे, पी.सी. मेश्राम, सुनिल पटले, वाय.के.रूद्रकार, डी. एन. शहारे, के.एम. रहांगडाले, एन.एल. ब्राम्हणकर, एल.एन. कुटे व जिल्ह्यातील इतर ग्रासेवक उपस्थित होते.