इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे फोटो असलेले डाक तिकिटे बंद करू नका- शिक्षण सभापती कटरे

0
7

गोंदिया दि.२०: टपाल तिकीटावरुन इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेली तिकीटे बंद करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत बालीशपणाचा असून त्याबद्दल मोदी सरकारचा निषेध करीत असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी म्हटले आहे.
संपुआच्या कारकीर्दित आधुनिक भारताचे शिल्पकार या नावाने काढलेल्या टपाल तिकीटाच्या मालीकेत इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, होमी जहांगीर भाभा, जेआरडी टाटा आणि मदर टेरेसा यांचा समावेश होता. सन २00९ साली यामध्ये ए.व्ही. शामास्वामी, सी.व्ही. रमन आणि रुक्मीनी देवी अंरुदले यांचा समावेश करण्यात आला.
एखादे नवीन सरकार देशात सत्तेवर आले तर त्या सरकारला वाटत असेल तर त्यांनी टपाल तिकीटांची नवीन मालीका सुरू करावी. तो त्या निर्वाचित सरकारचा तो अधिकर आहे. आम्हाला त्याचा विरोध नाही. परंतु ज्या महान विभुतींनी हा देश घडविण्यासाठी मोलाचे कार्य केले देशासाठी प्राणाची आहुती दिली त्यांना टपाल तिकीटाच्या मालीकेतून हद्दपार करणे कितपत योग्य आहे. याचा विचार देशातील सरकारने करणे क्रमप्राप्त आहे.
परंतु देशातील मोदी सरकारने माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेल्या टपाल तिकीटांना बंद करणे म्हणजे गांधी कुटुंबियांच्या प्रति असलेला मोदी सरकारचा नकारात्मक दृष्टीकोण व द्वेश भावना देशातील जनतेला समजल्या शिवाय राहणार नाही. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. देशातील जनता भोळी राहिलेली नाही.
इंदिरा गांधी व राजीव गांधी या साध्या व्यक्ती नव्हत्या. तर त्यांनी देशाचे पंतप्रधान पद भूषविले आहे. इंदिरा गांधीनी पाकिस्तानच्या विरोधात लढा देत पाकिस्तानला त्याची जागा दाखवून बांग्ला देशाची निर्मिती केली. राजीव गांधी यांनी देशात तंत्रज्ञानाची क्रांती घडवून देशाला प्रगती पथावर नेणारा दीपस्तंभ होते. हे कोणीही नाकारु शकत नाही. त्यामुळे त्यांची प्रतिमा असलेली टपाल तिकीटे हद्दपार करणे म्हणजेच देशातील सरकारची सुडभावनेची प्रवृत्ती स्पष्ट होते. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेली टपाल तिकीटे बंद केल्यास काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत, असा इशारा जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी दिला आहे.