साकोली नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती

0
10

साकोली,दि.८:राज्य शासनाने जाहीर केलेल्या साकोली नगर पंचायतीच्या निवडणुकीला आज बुधवारला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायाधीश वर्‍हाडे यांच्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे साकोली नगर पंचायत निवडणुकीची प्रक्रिया आता थांबणार आहे.
साकोलीत नगर पंचायत निवडणूक रद्द करुन नगर परिषद व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रेवाराम उर्फ मदन रामटेके यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने बुधवारला ४ वाजता साकोली नगर पंचायतच्या प्रस्तावित निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली आहे.
दोन महिन्यापूर्वी साकोली नगर पंचायतचे रुपांतर नगर परिषदेत व्हावे यासाठी साकोलीचे आमदार बाळा काशिवार यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी दि. ३ सप्टेंबर रोजी साकोली नगर परिषदेची उद्घोषणा केली होती. त्यावर आक्षेपासाठी एक महिन्याचा कालावधी दिला होता. मात्र याच दरम्यान शासनाने साकोली नगर पंचायत निवडणुकीची घोषणा केली. त्यामुळे लोकप्रतिनिधी व साकोली, सेंदूरवाफा येथील नागरिक संभ्रमात होते.
नगर परिषदेची उद्घोषणा जाहीर झाल्यामुळे भविष्यात नगर पंचायत स्थगित होऊन पुन्हा नगर परिषदेची प्रक्रिया लागू शकते, यात शासनाच्या व लोकांचा पैसा खर्च होऊ शकतो. यासाठी ही प्रक्रिया थांबविण्यात यावी, यासाठी माजी सभापती मदन रामटेके यांनी दि. ६ सप्टेंबर रोजी नागपूर खंडपीठात जनहीत याचिका दाखल केली. या निवडणुकीला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. या प्रकरणात याचिकाकर्ता रामटेके यांच्यावतीने अँड.शशीकांत बोरकर, अँड.दिलीप कातोरे यांनी बाजू मांडली तर शासनातर्फे अँड.दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली आहे.