34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ महिलेला रस्त्यावर मिळाली रोख 1.15 लाख रुपयांनी भरलेली बॅग; आणि मग तिने...

महिलेला रस्त्यावर मिळाली रोख 1.15 लाख रुपयांनी भरलेली बॅग; आणि मग तिने ‘…हे’ केले

0
113

blank

गोंदिया, दि.7 : तुम्ही रस्त्याने जात आहात आणि अचानक रस्त्यावर पडून असलेली तुम्हाला एक बॅग मिळाली. तसेच जर ती बॅग लाखो रुपयांच्या नोटांनी भरलेली असेल तर काय होईल, आणि तुम्ही काय कराल… साक्षात देवच पावला असे तुम्हाला वाटू शकेल. अशीच एक घटना गोंदिया शहरात घडली. एका महिलेला रस्त्यावर 1 लाख 14 हजार 900 रुपयांनी भरलेली बॅग मिळाली. मात्र देव पावला असे न समजता तिने काय केले हे गूढ जाणून घेणे रोमांचक ठरेल.

सध्या कोरोनामुळे सर्वत्र बेरोजगारी व आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत जर अचानक मोठा धनलाभ झाला तर अहोभाग्यच. पण धनापेक्षा गुणच श्रेष्ठ आहे, हे त्या महिलेने सचोटी व आपल्या प्रामाणिकपणाद्वारे सिद्ध केले. सीमा सूरज दास रा. मुर्री असे त्या महिलेचे नाव आहे.

सदर महिलेला गोंदिया शहराच्या मुर्री परिसरातील रस्त्यावर पडलेला एक बॅग मिळाला. त्यात तब्बल 1 लाख 14 हजार 900 रुपयांच्या नोटा भरलेल्या होत्या. तिने तो बॅग आपल्याकडे सुरक्षित ठेवून घेतला व आजूबाजूच्या दुकानदारांच्या सहकार्याने या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहचविली. त्या ठिकाणी पोलिसांची चमू येताच रुपयांनी भरलेला बॅग तिने पोलिसांच्या ताब्यात दिले आणि मग सुरू झाली बॅगच्या खर्‍या मालकाची शोधाशोध…

पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतचा संदेश व्हायरल करून खर्‍या मालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. ज्या किराणा व्यावसायिकाचे ते बॅग होते तो गोंदिया शहर पोलीस ठाण्यात पोहचला. रुपयांनी भरलेल्या बॅगबाबत पुराव्यानिशी माहिती दिल्यावर तोच खरा मालक असल्याची खात्री झाली. त्यानंतर त्याला बॅग परत करून पोलिसांनी सुद्धा आपली कर्तव्यनिष्ठा व प्रामाणिकपणाचा परिचय दिला.

घटना अशी आहे की, शनिवार, 5 जून रोजी गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस नायक जागेश्वर उइके व सुबोधकुमार बिसेन गस्तीवर होते. दरम्यान त्यांना मुर्री-चुटिया मार्गावर असलेल्या आशीर्वाद राईस मिलसमोर मोटारसायकलने जात असलेल्या एका व्यक्तीची बॅग रस्त्यावर पडली व ती बॅग मुर्री येथील रहिवाशी महिला सीमा सूरज दास यांनी उचलून स्वतःकडे सुरक्षित ठेवली आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांची चमू मुर्री परिसरात पोहचली व रुपयांनी भरलेली बॅग रस्त्यावर पडल्याबाबत विचारपूस केली. त्या महिलेने ती बॅग पोलिसांच्या सुपूर्द केली.

सदर बॅगमध्ये 1 लाख 9 हजार 900 रुपयांचे नोटांचे 8 बंडल व 5-10 रुपयांचे 5 हजारांचे सिक्के असे एकूण 1 लाख 14 हजार 900 रुपये होते. ही रक्कम पोलिसांनी जप्त करून खर्‍या मालकाचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले. रस्त्यांवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासण्यात आले. शिवाय राईस मिल असोसिएशन व इतर सामाजिक संस्थांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर रुपयांनी भरलेल्या सदर बॅगबाबत माहिती दिली. तसेच शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

सोशल मीडियावर हा संदेश वार्‍यासारखा व्हायरल झाला. त्यानंतर गोरेगाव तालुक्याच्या ग्राम इसाटोला येथील रहिवासी चैनलाल नत्थुलाल बिसेन हे गोंदिया शहर पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, 5 जून रोजी सकाळी 11.45 वाजता ते किराणा सामान खरेदी करण्यासाठी इसाटोला येथून गोंदियाकडे जात होते. दरम्यान त्यांच्या मोटारसायकलला बांधलेली रुपयांनी भरलेली बॅग मुर्री परिसरातील रस्त्यावर कुठेतरी पडली. त्या व्यक्तीने नोटांच्या योग्य विवरणाची माहिती सुद्धा पोलिसांना दिली. त्यानंतर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात सदर रक्कम त्या व्यक्तीच्या सुपूर्द करण्यात आली.

महिलेची सचोटी व प्रामाणिकपणा आणि पोलिसांची कर्तव्यनिष्ठा व प्रयत्नांची पराकाष्ठा यामुळेच शेवटी खर्‍या मालकाला त्याची रक्कम परत मिळाली.

blank