37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी राजभाज्या उपयुक्त – जिल्हाधिकारी नयना गुंडे

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी राजभाज्या उपयुक्त – जिल्हाधिकारी नयना गुंडे

0
75

blank

रानभाज्या महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद

गोंदिया,दि.10 : कोरोनाशी लढण्यासाठी चांगली रोगप्रतिकारशक्ती पाहिजे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी
रानभाज्या उपयुक्त असून आहारात समावेश केल्याने आरोग्यसंपन्न राहता येईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नयना
गुंडे यांनी केले.
तालुका कृषि अधिकारी कार्यालय व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त वतीने नविन
प्रशासकीय इमारत गोंदिया येथे 9 ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या
भेटीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्रीमती गुंडे बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, नगरपरिषदेचे
मुख्याधिकारी करण चव्हाण, तहसिलदार आदेश डफळ, अप्पर तहसिलदार अनिल खडतकर, जिल्हा अधीक्षक कृषि
अधिकारी गणेश घोरपडे, उपविभागीय कृषि अधिकारी भिमाशंकर पाटील, तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम,
महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती
होती.
जिल्हाधिकारी श्रीमती गुंडे यावेळी म्हणाल्या, रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म तसेच शरिराला आवश्यक
असणारे पौष्टिक घटक असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या अतिशय उपयुक्त आहेत. रानभाज्या
नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक फवारणी करण्यात येत नाही, त्यामुळे त्या पुर्णपणे सेंद्रीय असतात
असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना श्रीमती गुंडे म्हणाल्या, गोंदिया जिल्हा हा नैसर्गीकदृष्ट्या समृध्द असल्यामुळे रानभाज्यांचे योग्य
नियोजन करुन मोठ्या प्रमाणात लागवड करण्याकरीता कृषि विभागाने प्रयत्न करावे. जिल्ह्यात मशरुमचे उत्पादन
होत असून मशरुमला खुप चांगला प्रतिसाद मिळू शकतो. म्हणून मशरुम लागवडीचे योग्य नियोजन करुन नाविन्यपूर्ण
उपक्रमात समावेश करावा. रानभाज्या हंगामी असल्यामुळे त्यांच्यावर प्रक्रिया युनिट तयार करावे, जेणेकरुन शेतकरी
बांधवांना रोजगार मिळेल व शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावेल असे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी यावेळी विविध प्रकारच्या रानभाज्या स्टॉलची पाहणी करुन आयोजकांचे कौतुक केले.
प्रास्ताविकातून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे यांनी सांगितले की, 9 ऑगस्ट जागतिक
आदिवासी दिनाचे निमित्ताने रानभाजी महोत्सव घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 9 ते 15
ऑगस्ट दरम्यान रानभाजी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. रानभाज्याबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने व
रानभाज्यांच्या गुणधर्मानुसार त्यांचा विविध आजारांवर उपयोग व्हावा व त्याबद्दल शहरातील व ग्रामीण भागातील
नागरिकांना व शेतकऱ्यांना त्याची माहिती व्हावी याकरीता रानभाजी महोत्सव साजरा करण्यात येतो असे त्यांनी
सांगितले.
तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये गोंदिया तालुक्यातील कृषि विभागामार्फतचे शेतकरी, उमेद व महिला
आर्थिक विकास महामंडळ यांचे रानभाज्या विक्रीचे एकूण 48 स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये केना भाजी,
आघाडा, बारमाही लसून, कोचईचे पाने, बरमाराक्षसची पाने, सेवगा, सिल्लारी भाजी, आंबाडी भाजी, तरोटा भाजी,
पातूर भाजी, खापरखुटीची भाजी, उंदीरकानाची भाजी, हरदफरीची भाजी, कुंदरु, भूईआवळा, पदीना, कुड्याचे फुल
व कुड्याच्या शेंगा, केवकांदा, काटवल, करवंद, मटारु, कारले, घुया, सुरण, भूईलिंब, पानफुटी, गुळवेल, तेलपांढरा,
मशुरुम, भोंबोडी व इतर रानभाज्यांची विक्री करण्यात आली.

महिला बचत गटामार्फत रानभाज्यापासून बनविलेल्या खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते. रानभाजी महोत्सवात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रानभाज्यांची खरेदी केली. या महोत्सवाला शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनिल खडसे व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि अधिकारी सुनिल गोडगे, मंडळ कृषि अधिकारी प्रशांत कलेवार व श्री नंदनवार, कृषि पर्यवेक्षक श्री मेंढे, श्री भानारकर, श्री दमाहे, मनोहर देविकर व तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील सर्व कृषि सहाय्यकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपविभागीय कृषि अधिकारी भिमाशंकर पाटील यांनी मानले.

blank