साकोली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे लवकरच भूमिपूजन

0
9

साकोली,दि.१५:वर्षभरापूर्वी साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी, आष्टी-आलापल्ली-रेकनपल्ली-सिरोंचा या नवघोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू आहे. सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून या राष्ट्रीय महामार्गाचा डीपीआर (डिझेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर केला जाणार आहे.
पुढील डिसेंबर महिन्यात मंजुरी मिळालेल्या सर्व राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. या मार्ग निर्मितीमुळे परिसरातील दळवळण, उद्योगधंदे आणि विकासाला चालना मिळणार आहे.
साकोली-वडसा-चंद्रपूर राज्यमार्ग क्र. २७२ चे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला. त्यानंतर या मार्गाच्या विविध सर्वेक्षणाला सुरुवात झाली. साकोली-वडसा-गडचिरोली -चामोर्शी – आष्टी-आलापल्ली – रेकनपल्ली -सिरोंचा या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वर्षभरापासून या महामार्गाचे सर्वेक्षण, माती परीक्षण, नदी-नाल्यांवरील पुलांची संख्या, जंगलातील वृक्षांची संख्या याचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
मागील वर्षभरापासून या प्रकल्पाचा डीपीआर तयार होत आहे. सदर अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर केल्यानंतर या महामार्गाला अंतिम मंजुरी मिळणार असून निविदा प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. सानगडी गावाला छेदून गेलेला राज्यमार्ग क्र.२७२ यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होता. त्यावेळी बांधकाम विभागाने या मार्गावरील वाढती वाहतूक व वाहनसंख्या लक्षात घेवून सानगडी येथे अनेकदा बायपास मार्ग तयार करण्यासाठी सर्वेक्षण केलेला आहे.