कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण माह कार्यक्रमाचे आयोजन

0
135

गोंदिया–पोषण दर्जा सुधारण्यासाठी व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी ठरविण्यात आलेली उद्दिष्ट साध्य करण्याकरीता जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागातील १८0५ व शहरी भागातील ९७ अंगणवाडी केंद्र असे एकूण १९0२ अंगणवाडी केंद्रात पोषण अभियान अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या, किशोरवयीन मुली व महिलांच्या पोषणाच्या दर्जा सुधारण्यासाठी व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध स्तरावरुन १ ते ३0 सप्टेंबर दरम्यान पोषण माह उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्व सहकारी विभागांनी व सर्व जनतेनी उत्स्फुर्तपणे राबवून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.
या कालावधीत संपूर्ण देशात पोषण माह साजरा करण्यात येत आहे. या महिन्यामध्ये गोंदिया जिल्ह्यात विभागाच्या समन्वय व सहकार्याने गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, 0 ते ६ वर्षे वयोगटातील बालक, साधारण श्रेणीची बालके, मध्यम कमी वजनाची बालके व तीव्र कमी वजनाची बालके यांच्याकरीता अंगणवाडी स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर, शालेय स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमामध्ये गावातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठीत नागरिक, महिला मंडळ, महिला समुह व महिला बचतगट, किशोरवयीन मुलामुलींचे गट सहभागी होणार आहेत.
पोषण अभियानाअंतर्गत ठरविण्यात आलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी दरवर्षी जिल्ह्यात पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांचा समन्वय करण्यात येणार असून महिला व बालविकास विभाग हा अंमलबजावणीकरीता नोडल विभाग घोषित करण्यात आलेला आहे. विविध विभागामध्ये ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नगर विकास विभाग, अन्न व औषध विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, खाद्यपोषण आहार बोर्ड, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन इत्यादी विभागाचा समावेश करण्यात आलेला आहे.
प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी- पोषण अभियानाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आरोग्य व पोषण विषयक बाबींवर प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी शिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आलेला असून त्याअंतर्गत केंद्र शासनामार्फत विविध विषयावरील २१ प्रशिक्षण मोड्यूल्स तयार करण्यात आलेले आहे. या मोड्यूल्सचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
कुपोषणाच्या समस्येवर विविध घटकांचा परिणाम होत असतो. या बाबींचा विचार करुन समाजात प्रचलीत असलेल्या रुढी, परंपरा यांचे कुपोषण समस्या सोडविण्यासाठी चांगल्या पध्दतीचा वापर करणे आवश्यक आहे. यासाठी प्रामुख्याने खालील पाच प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास केंद्र शासनाने निर्देशित केले आहे.
प्रत्येक अंगणवाडी केंद्रात दरमहा सामुदायिक कार्यक्रमाचे उदा. गरोदरपणाचा तिसरा महिना साजरा करणे, अन्न प्राशन, सुपोषण दिवस, पुर्व माध्यमिक शिक्षण नोंदणी व आरोग्य विषयक संदेश जनतेपयर्ंत पोहचविणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कुपोषण निर्मुलनाबाबत व आरोग्य शिक्षणासंदर्भात समाजास जागृत करण्यासाठी ही एक प्रभावी माध्यम आहे. पोषण अभियान हे लोकचळवळ व्हावे यादृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन त्यामध्ये पंचायत राज संस्था, महिला बचतगट, स्थानिक स्वयंसेवी संस्था इत्यादींचा सहभाग घेऊन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
१ ते १७ ऑगस्ट २0२१ या कालावधी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील १८0५ अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांची वजन व उंची तसेच आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये रअट श्रेणीत आढळून असलेल्या बालकांना ग्रामबाल विकास केंद्रात दाखल करण्यात येऊन त्यांना श्रेणीवर्धन करण्याबाबत महिला व बालविकास आणि आरोग्य विभाग प्रयत्नशील असणार आहे.
सदर अभियाना दरम्यान महिला व बालविकास विभागाकडील माझी कन्या भाग्यश्री व आरोग्य विभागाकडील मातृ वंदना योजनेची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी करावयाची आहे. आजअखेर पयर्ंत गोंदिया जिल्ह्यात मातृ वंदना योजनेअंतर्गत ४६0३७ उद्दिष्ट असून ४२४५0 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यासाठी एक कोटी त्र्यानव्व लाख साठ हजार तरतूद वितरीत करण्यात आली. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत ६४९ लाभार्थ्यांना गुंतवणूक प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
१ ते ३0 सप्टेंबर या कालावधी दरम्यान राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमास सर्व सहकारी विभागांनी व सर्व जनतेनी उत्स्फुर्तपणे राबवून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.