नंगपुरा मुर्री अतिक्रमणाच्या विळख्यात;प्रशासनाचे दुर्लक्ष

0
47

गोंदिया,दि.01 : शहराला लागून असलेल्या नंगपुरा मुर्री ही मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायती अंतर्गत एफसीआयचे गोदाम तसेच शासकीय वसतीगृह या सारख्या संस्था आहेत. या शिवाय शहरातील अनेक व्यापार्‍यांचे गोदामही आहेत. मात्र मागील काही वर्षापासून ग्रामपंचायतीच्या आर्शिवादाने गावात अतिक्रमणाला जोर आला आहे. अनेक नागरिकांनी अवैधरित्या शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. या बाबतची तक्रार ग्रामपंचायत तसेच संबंधित यंत्रणेला करण्यात आली. परंतु अद्यापही याची दखल घेण्यात आली नसल्याने प्रशासनाचे आर्शिवाद अतिक्रमण धारकांना असल्याचे बोलले जात आहे.
शहराला लागून असल्याने नंगपुरा मुर्री या ग्राम पंचायतीला वेगळे महत्व प्राप्त आहे. गावातील जमिनीचे दर गगणाला भिडले आहेत. याच संधीचा लाभ घेत गावात अतिक्रमणाचा जोर वाढला आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण करणारे मधुकर रहांगडाले, भैय्यालाल रहांगडाले, सौ. विना टालटे, सौ. पुजा बिजेवार, लक्ष्मीकांत रहमतकर, तिर्थराज रहांगडाले, अभिमन्यु सोनेवाने, भुमराज रहमतकर, संदीप टेंभेकर यासह अनेकांची तक्रार गावातील नागरिक तिर्थराज हरिणखेडे यांनी निवेदनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीसह जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, खंडविकास अधिकारी यांना दिली. मात्र तक्रारीनंतर प्रशासकीय यंत्रणा कोणतेही कारवाई करण्यास पुढे आलेली नाही. जर या प्रकारावर आळा बसला नाही तर गावात असलेली खुली शासकीय जागा शिल्लक राहणार नाही, अशी भिती ग्रामस्थांनांनी व्यक्त केली आहे. या प्रकाराला ग्रामपंचायत जबाबदार असून गावातील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
रेती व बजरीची अवैध साठवणूक
अतिक्रमण केल्यानंतर अनेकांनी उर्वरित शासकीय जागेवर अनेक ठिकाणी रेतीचा व बजरीचा अवैध साठा ठेवण्यात आला आहे. रेती तस्करांनी पावसाळ्यापूर्वीच हा साठा करून ठेवला आहे. एकीकडे महसूल विभाग ग्रामीण भागातील ट्रॅक्टर चालकांना अवैधरित्या रेती वाहतूक प्रकरणी कारवाई करते. तर दुसरीकडे अवैधरित्या ठेवलेला शासकीय जागेवरील रेती व बजरीचा अवैध साठयावर कारवाई का करीत नाही? असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.