मनरेगाच्या कामात अनियमितता,दोषींच्या निलंबनासाठी शिफारस करणार

0
66

रोहयो समितीप्रमुख आमदार चंद्रिकापुरेंची माहिती

चंद्रपूर-मागेल त्याला काम, असे ब्रीद असलेल्या रोहोयोच्या चंद्रपूर जिल्ह्यातील कामांत अनियमितता आढळून येत आहे. समितीकडून कोणत्याही जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसून, शासनाला निलंबनासाठी शिफारस करणार असल्याची माहिती रोहयो समितीचे प्रमुख आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी पत्रकारांना दिली.

रोजगार हमी योजना समितीने मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कामांची पाहणी केली. शनिवारी नियोजन भवनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. समितीने तीन गटात विभागणी करून १३ तालुक्यात पाहणी दौरा केले. जवळपास प्रत्येक विभागाचे अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट म्हणून संबोधलेले काम बघितले. मात्र, कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकच कामात अनियमितता असल्याचे समितीच्या निदर्शनास आले असल्याने या कामांची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार चंद्रिकापुरे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असून, त्यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचीही विधीमंडळ समितीसमोर साक्ष लावून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनरेगाचा विकास आराखडा, लेबर बजेट तयार करण्यात आले नसल्याने हजारो मजुरांना कामापासून वंचित राहावे लागले, असे समितीचे मत झाले आहे. समितीत १२ सदस्य सहभागी झाले होते. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात कामे पाहता आली नाही. सन २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षांतील कामांचा पाहणी दौरा केला असून, काही दिवसातच यासंदर्भातील अहवाल तयार केला जाणार आहे.

रोहयोच्या राज्य प्रमुखांसमोर परिस्थिती मांडणार
ब्रह्मपुरी तालुक्यात मनरेगाच्या कामांमध्ये मस्टर नसताना निधी हस्तांतरणाचा प्रकार समोर आला असून, यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीही तक्रार केली आहे. या कामांसंदर्भातील माहिती पुन्हा घेतली जाणार असून, रोहयोचे राज्य प्रमुख तथा अतिरिक्त मुख्य सचिवांना बोलावून त्यांच्यासमोर सर्व त्रुटी दाखविल्या जाणार आहे. त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचेही समितीप्रमुख आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी सांगितले.