फुलचूर नगरपंचायतीसाठी नागरिकांच्या आंदोलनाला भाजपचे समर्थन

0
43
गोंदिया,9 सप्टेंबर–शहराजवळील फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायतीचे समायोजन करून नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाला तातडीने पाठविण्यात यावा, या मागणीसाठी माजी जिप सदस्य राजेश चतूर तसेच  फुलचूर व फुलचूरटोलावासीयांनी 8 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाला सुरुवात करुन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाला भाजपचे समर्थन जाहीर केले व पत्र दिले.  यावेळी माजी आमदार हेमंत पटले, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, गजेंद्र फुंडे, मनोज मेंढे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनानुसार, फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायतीचे समायोजन करून नगर पंचायतीचा दर्जा देण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून होत आहे. याबाबत 21 डिसेंबर 2019 रोजी दोन्ही ग्रापंकडून प्रस्ताव सादर करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. मात्र या संदर्भात मार्गदर्शन व सुचनांच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाकडून नगरपंचायतीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. नगर विकास मंत्रालयाने या संदर्भात तसा प्रस्ताव पाठविण्याची सुचनाही जिल्हा प्रशासनाला केल्यानंतरही दोन वर्षापासून नगरपंचायतीचा प्रस्ताव पडून आहे. यामुळे फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन्ही गावातील नागरिकांमध्ये जिल्हा प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. तसा प्रस्ताव पाठविण्यात आला नाही, आंदोलनाचा इशाराही माजी जिप सदस्य चतूर व ग्रामस्थांनी दिला होता. मात्र त्याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाला भाजपचे समर्थन जाहीर केले.