सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचे पंप नादुरुस्तच!

0
12

भंडारा –जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून वाहणाऱ्या बावनथडी नदीपात्राच्या क्षेत्रात सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीपात्रातून पाणी उपसा करणाऱ्या तुमसर तालुक्यातील सोंड्याटोला या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पात पाणी उपसा करणारे पंपच नादुरुस्त अवस्थेत पडले आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र

बावनथडी नदीवरील सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात एकूण नऊपैकी चार पंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. तसेच या नादुरुस्त होऊन पडलेल्या पंपाच्या साहित्यांचाही पत्ता नाही. गेल्या तीन वर्षांपासून निविदा कंत्राटदाराने दुरुस्त झालेले पंप अद्याप प्रकल्प स्थळात आणलेले नाहीत. संबंधित उपकरणे नागपुरात दुरुस्तीसाठी देण्यात आले असल्याची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे.

परिणामी, प्रकल्पस्थळात सध्या फक्त उर्वरित पाच पंपांद्वारेच पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. सोबतच, पाणी उपसा करणारे हे पाच पंपसुद्धा अगदी सलाईनवर असल्यासारखेच आहेत. हे पंप कोणत्याही क्षणात बंद पडू शकतात अशी वेळ आली आहे. यामुळे नदीपात्रातून पाण्याचा उपसा कधीही थांबण्याची शक्यता जास्त आहे.संबंधित प्रशासन व निविदा कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे प्रकल्प स्थळात हे संकट ओढवले आहे. त्यामुळे चांदपुर जलाशयाच्या भरवशावर भातशेती करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर सिंचनाचे संकट ओढवणार आहे.