वीज पडून 100हून अधिक शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू

0
109

गडचिरोली.दि 11_-: कोरची मुख्यालयापासून सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावर मसेली नजीक असलेल्या सावलीच्या जंगलात राजस्थान येथील मेंढपाळ त्यांच्या शेळ्या व मेंढ्यांचे कळप घेऊन डेरा टाकला असताना मागील रात्री दहा ते साडे अकराचे सुमारास अचानक वीज पडून 100 ते 110 शेळ्या व मेंढ्या जागीच ठार झाल्या. या घटनेत सदर मेंढपाळांचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

कोरची तालुक्यात दरवर्षी राजस्थान व गुजरात येथून हे मेंढपाळ शेळ्या व मेंढ्यांना चारण्यासाठी घेऊन येत असतात. या वर्षी सुद्धा कोरची तालुक्यात त्यांचे दोन डेरे आलेले आहेत. यापैकी एक डेरा बेळगाव परिसरात व दुसरा डेरा मसेली-सावली परिसरात होते. या दोन्ही डेऱ्यात 7 ते 8 मेंढपाळांच्या कुटुंबांचा समावेश असून ते 1000-1200 च्या जवळपास शेळ्या-मेंढ्यां व इतर जनावरे घेऊन आपला प्रवास करीत असतात.

9 सप्टेंबर च्या रात्री दहा ते साडे अकराच्या सुमारास मसेली-सावली परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. दरम्यान मेंढपाळांच्या  डेऱ्याजवळ अचानक वीज पडली त्यात कळपातील 100 ते 110 शेळ्या व मेंढ्या जागच्या जागीच मरण पावल्या. सदर घटनेची माहिती मेंढपाळांशी संपर्कात असलेल्या एका स्थानिक खाटकाला आज सकाळी प्राप्त झाली ती सूचना त्याने कोरची चे तहसीलदार छगनलाल भंडारी यांना दिली. माहिती प्राप्त होताच तहसीलदारांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. व  डेऱ्याचे ठिकाण बदलण्याची सूचना केली. सुचनेनुसार त्या डेरेदार मेंढपाळांनी आपला डेरा तिथून दुसर्‍या जागी हलविला आहे. उल्लेखनीय आहे की सदर मेंढपाळांनी प्रशासनाकडे कुठलीही नुकसान भरपाई मागितलेली नाही.