युरीयाच्या टंचाईसाठी जिल्हा प्रशासन जबाबदार- मोरेश्वर कटरे

0
36

* युरीयाच्या टंचाईमुळे शेतकर्‍यांची वणवण
*कृत्रिम टंचाई दाखवून केली जात आहे चढ्या दराने विक्री
गोंदिया – मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात युरीया खताच्या कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून त्याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. एकंदरीत जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकर्‍यांना युरीया खतासाठी वणवण भटकावे लागत असून चढ्या दराने खरेदी करावे लागत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी केला आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून शेतीसाठी आवश्यक असणार्‍या युरीया खताची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी मिळेल ते दाम देऊन युरीया खत करण्यासाठी भटकत आहे. 300 रुपयाला मिळणारी खत बोरी सध्या 500 रुपये देऊन ही शेतकर्‍यांना उपलब्ध होत नाही. गोरेगाव तालुक्यातील अनेक कृषी केंद्र संचालक 500 रुपये घेऊन खत विक्री करीत आहेत. मात्र प्रशासन धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करून कृषी विभागाला धारेवर धरत शेतकर्‍यांना योग्य दरात कसे युरीया खत उपलब्ध करून देण्यात येईल यासंदर्भात नियोजन करावे, अशी मागणी माजी जिल्हा कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी केली आहे.