देशातील सर्वात उंच स्वराज्यध्वजाचे वाशिमच्या पोहरादेवी संस्थानात पूजन संपन्न

0
12

वाशिम-देशातील सर्वात उंच स्वराज्यध्वज म्हणून ओळखल्या गेलेल्या स्वराज्य ध्वजाने आज वाशिम जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे. आज हि स्वराज्य ध्वज मोहिम प्रवासाच्या दुस-या टप्प्यात आहे. वाशिममधील विख्यात तीर्थक्षेत्र आणि बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणा-या पोहरादेवी संस्थानाला आज ध्वज मोहिमेने भेट दिली. वाशिमचे हे पुरातन पोहरा देवी मंदिर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. पोहरादेवी ट्रस्टचे बाबूसिंग महाराज यांनी आज स्वराज्य ध्वज मोहिमेचे स्वागत केले. देवीचे आशिर्वाद घेतल्यानंतर ध्वज पूजनही संपन्न झाले. यावेळी
बलदेव महाराज, प्रेमदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत कबिरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज, राजू भाऊ गुल्लाने(ओबीसी सेल प्रदेश सचिव), यशवंत इंगळे-तालुका अध्यक्ष, प्रमोद चौधरी-युवक अध्यक्ष , संजय गुजाडे-तालुका अध्यक्ष युवक, मनोहर पाटील-माजी युवक अध्यक्ष, गोपाल भोयर, आशिष पाटील, विजू वानखेडे, गजानन राऊत, श्रीमंत इंगळे, सचिन रोकडे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
शक्ती, निष्ठा, संयम, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजाने राज्यातील अनेक शहरांमध्ये पोहोचून तिथल्या स्थानिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा वसा घेतलेला आहे. स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेला समाजातील सर्वच थरांमधून उत्फुल्ल प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सोळा जिल्ह्यांतील हजारो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून स्फूर्तीचा अनुभव घेतला आहे.
गेल्या सोमवारी विदर्भात प्रवेश करून काल या ध्वज मोहिमेचे वाहन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दाखल झाले, येथील भद्रावती तालुक्याच्या शहरात ध्वजाच्या प्रतिमेचे स्वागत झाले व भद्रावती शहरातील जैन श्वेतांबर मंदिरात पूजन करण्यात आले. पूर्व विदर्भातील मुक्कामात स्वराज्य ध्वज मोहिमेने कोरंभी येथील भंडाराचे ग्रामदैवत पिंगेश्वरी देवी मंदिर, सूर्यदेव-मांडो देवी मंदिर, लेखामेंढा गाव आदि ठिकाणीही भेट दिली आहे.
महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणा-या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी जोषपूर्ण प्रतिसादात स्वागत होत आहे. प्रवासातील खराब हवामान, वाहतूकीतील अडचणी इत्यादी अडथळ्यांची पर्वा न करता वाटचाल सुरू ठेवत या ध्वज पूजन मोहिमेने नवव्या दिवसात पदार्पण केले आहे.
सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठीचा हा वैशिष्टयपूर्ण ७४ मीटर उंच भगवा ध्वज महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करत एकूण ३७ दिवस प्रवास करणार आहे अशी माहिती स्वराज्य ध्वजाचे संकल्पनाकार आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा सुरू करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे तसेच कर्जत-जामखेडची नवी ओळख तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आपण स्वराज्य ध्वजाची संकल्पना साकारल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय.
दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया(बिहार), केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधीक पूजन करावे हि या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी राज्यातील ३६ जिल्हे आणि सहा राज्यांसह १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.
हि स्वराज्य ध्वज पूजन यात्रा पूर्णपणे लोकसहभागातून आणि सहकार्यातून संपन्न होणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://rohitpawar.org/swarajyadhwaj/ या संकेतस्थळावर पाहाता येईल.