टप्पा-1 करिता सलग वीज पुरवठा द्या, वीज वितरणाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन

0
27

तिरोडा, दि.6 : शेतकर्‍यांनी उन्हाळी पीक लावले आहे. मात्र शेवटच्या टोकावर असलेल्या शेतांमध्ये पाणी पोहचत नाही. यासाठी महावितरणकडून होणारे 8 ते 9 तासांचे भारनियमन कारणीभूत आहे. त्यामुळे भारनियमन 8 तासांवरून 24 तास करावे, मात्र धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-1 करिता सलग 5 दिवसापर्यंत 24 तास सलग वीज पुरवठा करण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन कवलेवाडा ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी गोंदियाचे अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले आहे.

निवेदनानुसार, धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-1 अंतर्गत एकूण 6500 हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात येते. सद्यस्थितीत महावितरणकडून अंदाजे 8 ते 9 तासांचे भारनियमन असल्यामुळे कॅनेल व्यवस्थेद्वारे टोकाच्या शेतापर्यंत पाणी पोहचण्यात अडथडा निर्माण होत आहे. त्यामुळे लोडसेडिंग (भारनियमन) 8 तासांवरून 24 तास सलग करण्यात यावे. मात्र धापेवाडा टप्पा-1 करिता सलग 5 दिवस विजेचा पुरवठा करण्यात यावा. त्यामुळे टोकाच्या शेतापर्यंत पाणी पोहचण्यास मदत मिळेल.या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे गरीब कास्तकारांना पाणी मिळेल व भारनियमनाचे उल्लंघनही होणार नाही. सदर समस्या त्वरित मार्गी लावण्यात यावी. अन्यथा भारनियमनामुळे शेतकर्‍यांवर उपासमारीची पाली येऊ शकते. तसेच येणार्‍या दोन ते तीन दिवसांत भारनियमन 24 तास करून सलग 5 दिवस विजेचा पुरवठा करण्यात यावा. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करून सदर घटनेचा निषेध करण्यात येईल, असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.