टीईटी परीक्षेच्या घोटाळ्याची व्याप्ती पोहोचली तब्बल 240 कोटींपर्यंत, आयएएस सुशील खोडवेकरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

0
32

पुणेः-  राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१९ च्या परीक्षेतील पेपरफुटीत गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या प्रकरणात परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांपासून राज्य परीक्षा परिषदेचे संचालकही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. परीक्षेच्या अंतिम यादीतील निम्म्या परीक्षार्थींंकडून पैसे स्वीकारून त्यांची नावे बनावट पद्धतीने टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.

या परीक्षेत आर्थिक व्यवहार करण्यात आलेल्या प्रत्येक परीक्षार्थीकडून ३ ते ४ लाख रुपये घेण्याचे ठरवून तब्बल २४० कोटी रुपयांपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती गेल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेला भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) सुशील खोडवेकर याचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यापूर्वी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनीही खोडवेकर याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्याच्या समाेरील अडचणीत वाढ झाली आहे. टीईटी २०१९ ची परीक्षा जी.ए.साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली. या परीक्षेकरिता राज्यभरातून एकूण तीन लाख ४३ हजार २८४ जणांनी परीक्षा दिली. सदर परीक्षेच्या अंतिम निकालाच्या यादीत एकूण १६ हजार ७०५ जण पात्र झाल्याचे सांगण्यात आले आणि त्यांना टीईटीची प्रमाणपत्रे देण्यात आली.

परीक्षेतील पेपरफुटीचा घाेटाळा उघडकीस आल्यानंतर आराेपींकडून मिळालेल्या यादीनुसार परीक्षेत तब्बल ७ हजार ८८० अपाक्ष परीक्षार्थींना पात्र करण्यात आल्याचे दिसून आले. वेगवेगळ्या चार गैरव्यवहार पद्धतीच्या माध्यमातून आराेपींनी अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आराेपी एकमेकांच्या संपर्कात
टीईटी-२०१९ परीक्षेचा पेपर आराेपींनी संगनमताने कट रचून फाेडल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहे. परीक्षेचा पेपर फाेडताना आराेपींनी एकमेकांशी केलेले माेबाइलवरील चॅटिंग, एसएमएस, फाेन काॅल्स याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना उपलब्ध झाली आहे. त्याशिवाय आराेपींनी कोणकोणत्या एजंटशी संपर्क साधला याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली आहे. जी.ए.साॅफ्टवेअर कंपनीस एक जून २०२० राेजी काळ्या यादीत टाकण्यात आल्यानंतर तत्कालीन राज्य परीक्षा परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे याने ३० सप्टेंबर २०२० राेजी सदर कंपनीला काळ्या यादीतून कशाप्रकारे बाहेर काढले याबाबतचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागलेले आहेत.

एकूण ४ कोटी ६८ लाखांचा ऐवज जप्त
राज्य परीक्षा परिषदेचा तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे, शिक्षण विभागातील उपसचिव सुशील खोडवेकर, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर आणि जी.ए.साॅफ्टवेअर कंपनीचे काम पाहणारा डाॅ. प्रीतिश देशमुख यांनी परीक्षेचा पेपर फाेडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एकूण १४ जणांना अटक करण्यात आली ४ कोटी ६८ लाख ५५ हजारांचा एेवज जप्त केला.