‘कॅच द रेन’ मोहिमेचा सर्वंकष आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी नयना गुंडे

0
29
  • पावसाचं पाणी साठवा
  • तलाव क्षेत्र मोजणी करा
  • नाविन्यपूर्ण कामे घ्या

         गोंदिया,दि.8 : केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान कार्यक्रमांतर्गत ‘कॅच द रेन’ मोहीम जिल्हाभर राबविण्यात येणार असून कार्यान्वित यंत्रणांनी या मोहिमेचा सर्वंकष आराखडा तयार करावा. छतावरील पाऊस पाणी संकलन, विहीर पुनर्भरण, मामा तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, तलाव अतिक्रमण मुक्त करणे या सोबतच नाविन्यपूर्ण काम करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिल्या.

        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. उपवनसंरक्षक कुलराज सिंह, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, वरिष्ठ भु-वैज्ञानिक एस. एस. खोडे, सत्यजित राऊत व अधिकारी उपस्थित होते.

        जलशक्ती अभियान कार्यक्रमांतर्गत ‘कॅच द रेन’ मोहीम राबविणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे अस्तित्वातील रेन वाटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चरची दुरुस्ती करून पावसाच्या पाण्याची साठवण करणे हे आहे. नवीन कृत्रिम स्ट्रक्चर तयार करणे, विद्यमान तलाव आणि जल स्त्रोतांचे पुनरुज्जीवन करणे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी नद्यांचे पुनरुज्जीवन करणे या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व जलाशयांचे जिओ टॅगिंग करून माहिती गोळा करून या योजनेअंतर्गत नियोजन करण्यात येणार आहे.

         रेन वाटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चरच्या बांधकामाद्वारे व दुरुस्तीद्वारे जास्तीत जास्त पाणी साठवणे यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या मोहिमेचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी यापूर्वी झालेल्या दुरदृश्य प्रणाली बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने आज आढावा घेण्यात आला.

         जिल्ह्याचा आराखडा तयार करतांना सिंचन विभाग, कृषी विभाग व वन विभागाकडे अस्तित्वात असलेल्या जल स्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यास प्राधान्य देण्यात यावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गोंदिया जिल्हा हा माजी मालगुजारी तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. बरेच तलाव अतिक्रमीत झाले असून ‘कॅच द रेन’ मोहिमेच्या अनुषंगाने तलाव क्षेत्र मोजणी व अतिक्रमण मुक्त तलाव मोहीम राबविण्यात यावी असे त्यांनी सांगितले. तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, विहीर, कुपनलिका पुनर्भरण पाणी अडवा, पाणी जिरवा या सारखे उपक्रम राबविण्यात यावेत.

          सर्व शासकीय इमारतीच्या छतावरील पाऊस पाणी संकलन करण्यावर भर देण्यात यावा. नवीन रहिवाशी इमारत बांधकाम परवानगी देतांना छतावरील पाऊस पाणी संकलन अनिवार्य करण्यात यावे अशा सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच ‘कॅच द रेन’ मोहिमेत नाविन्यपूर्ण कामे घेण्यात यावीत. या मोहिमेत लोकसहभाग वाढवावा असेही त्या म्हणाल्या. आराखडा सर्वंकष व परिपूर्ण करण्यावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले. या मोहिमेचे नोडल अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी आहेत.