Home विदर्भ जिमलगट्टा तालुक्यासाठी रास्ता रोको आंदोलन

जिमलगट्टा तालुक्यासाठी रास्ता रोको आंदोलन

0

अहेरी, दि.११: गडचिरोली जिल्ह्यात  स्वतंत्र जिमलगट्टा तालुका निर्माण करावा, या मागणीसाठी जिमलगट्टा फाटयावर आज चक्काजाम आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्यात आले.जिमलगट्टा हे अहेरी तालुक्यातील मोठे गाव असून, येथे पोलिस ठाणे, आश्रमशाळा, वनविभागाचे कार्यालय तसेच अन्य कार्यालयेही आहेत. परंतु मोठे गाव असूनही या गावाच्या विकासाकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. जिमलगट्टा हे गाव तालुका मुख्यालयापासून ४० किलोमीटरवर असल्याने नागरिकांना नानाविध समस्यांना तोंड दयावे लागते. शिवाय या गावापलिकडे असललेल्या देचली, पेठा, किष्टापूर, बिऱ्हाडघाड व अन्य गावांचेही अंतर खूप आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांना शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे स्वतंत्र जिमलगट्टा तालुका निर्माण करावा, या व अन्य २० मागण्यांसाठी जिमलगट्टा परिसरातील २० गावांतील नागरिकांनी आज सामाजिक कार्यकर्ते ऋषी पोरतेट यांच्या नेतृत्वात जिमलगट्टा फाटयावर चक्काजाम आंदोलन केले. यामुळे सिरोंचा व नागपूरकडे जाणारी वाहतूक तासभर ठप्प्‍ा होती.

Exit mobile version