सतत गैरहजर राहणारे १७ पोलिस कर्मचारी निलंबित

0
85

नागपूर- नागपूर शहर पोलिस आयुक्तांनी त्यांच्याच कर्मचार्‍यांना ‘जोरका झटका’ दिला आहे. सतत गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतरही काही कर्मचारी हे कामावर आले नाही. अशांवर थेट निलंबनाची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली. आयुक्तांच्या कडक पवित्र्यानंतर पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस विभागात कर्तव्यदक्ष कर्मचार्‍यांसोबतच सतत रजा घेऊन गैरहजर राहणार्‍यांची संख्या मोठी आहे. कर्मचार्‍यांच्या अशा गैरहजेरीमुळे त्यांच्या कामाचा ताण अन्य कर्मचार्‍यांवर आपसूकच येतो तर यातून अनेकदा कामही प्रभावित होते.
ही बाब लक्षात आल्यानंतर आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा कर्तव्यावर गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांची यादीच तयार केली होती. आयुक्तांनी तयार केलेल्या यादीत मोठय़ा प्रमाणात अधिकारी तसेच कर्मचारी यांचा समावेश होता. या दांडीबहाद्दरांना कावाईपूर्वी एक संधी द्यावी, याकरिता आयुक्तांनी या यादीतील सर्व कर्मचार्‍यांना दोन दिवसांत कर्तव्यावर हजर राहवे, असे आदेश जारी केले जाते.
आयुक्तांचा कारवाईवजा इशारा लक्षात घेता यातील काही अधिकारी व कर्मचारी कामावर परतेलही. परंतु, काही कर्मचारी परतले नव्हते. या सर्व कर्मचार्‍यांवर आयुक्तांनी थेट निलंबनाची कारवाई केली. कारण या कर्मचार्‍यांना कामावर परतले का नाहीत, अशी विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.
निलंबनाच्या कारवाईचा १७ कर्मचार्‍यांवर बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान, आयुक्तांच्या कठोर पवित्र्यामुळे पोलिस दलात आहे त्याहून अधिक शिस्तीचे वातावरण निर्माण होईल, असे बोलले जात आहे.